पिंपरी | कुंडमळा येथे पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू

इंदोरी (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मावळ वन्यजीव रक्षक संस्थेच्या सदस्यांनी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. ही घटना गुरुवारी (दि. २) सायंकाळी घडली.
साजीद शरीफ बागवान (वय 20, दोघेही रा. आझाद चौक, निगडी) व आतीक शरीफ बागवान (वय 15, रा. निगडी, मूळगाव जळगाव) अशी मयत झालेल्या मुलांची नावे आहेत. ते गुरुवारी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास कुंडमळा येथे पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र पाण्यातील नदीच्या खोलीचा अंदाज न असल्याने ते दोघेही पाण्याबत बुडाले होते.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वन्यजीव रक्षक टीमला याबाबत माहिती दिल्यानंतर रेस्क्यु पथकाने तात्काळ घटनास्थळी वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या पथकांमधील निलेश गराडे, प्रशांत भालेराव,
गणेश गायकवाड, भास्कर माळी, अविनाश कारले, सागर भेगडे, अनिश गराडे, गणेश सोंडेकर व एमआयडीसी पोलीस स्टेशन यांच्या पथकाने ही शोध मोहीम राबवली. त्यानंतर सायंकाळी त्या दोघांचे मृतदेह मिळून आले. त्यांच्या मृत्यूमुळे ओटास्कीम, निगडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





