Omraje Nimbalkar : ठाकरे गटाच्या दोन शिलेदारांनी घेतली ओमराजेंची भेट; मध्यरात्री पुण्यात नेमकं काय घडलं?
Omraje Nimbalkar : आता विविध चर्चांना उधाण आले असून, ओमराजेंच्या मनात नेमकं चाललयं तरी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Omraje Nimbalkar : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहापैकी पाच खासदारांनी साथ सोडली असल्याची माहिती समोर आली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मतदारसंघात गेल्यावर कार्यकर्त्यांशी चर्चा पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले असून, ओमराजेंच्या मनात नेमकं चाललयं तरी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काल ओमराजे यांचे वडील पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा निकाल लागला. या निकालात कोर्टाने या प्रकरणातील मुख्य आरोपीसह इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली. हा निर्णय ओमराजे यांच्यासाठी मोठा धक्का देणारा मानला जात आहे. अशातच काल पुण्यात मध्यरात्री घडलेल्या एका भेटीने राजकीय वर्तुळात नव्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी ठाकरे गटाचे नेते आणि आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी अचानक भेट दिल्याने नव्या चर्चांना उधाण मिळाले आहे.आज दिल्लीत ठाकरे गटातील फुटीर खासदार पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले जात असताना ही भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे. ही भेट ठाकरे गटाकडून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
हेही वाचा : Water Cut: पिंपरी-चिंचवडकरांनो पाणी जपून वापरा! शहरात आजपासून पाणीकपात लागू; वाचा नवे वेळापत्रक
याआधी ओमराजे निंबाळकर यांनी आपण अद्याप शिंदे गटात जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच पक्षाच्या व्हीपनंतर झालेल्या बैठकीस गैरहजर राहिलेल्या खासदारांना नोटिसा बजावण्यात आल्याच्या वृत्तामुळेही त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, या गुप्त भेटीबाबत प्रतिक्रिया देताना वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांनी कोणताही राजकीय हेतू नसल्याचा दावा केला. “आम्ही केवळ मित्र म्हणून ओमराजे यांची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो,” असे त्यांनी सांगितले. ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्या चर्चेचा तपशील उघड करण्यास नकार दिला.
सरदेसाई म्हणाले, “ओमराजे निंबाळकर हे मशाल चिन्हावर निवडून आलेले खासदार आहेत. त्यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणातील निकालामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आम्ही त्यांची भेट घेऊन सांत्वन केले.”
ओमराजेंचा आदित्य ठाकरे यांच्यासोबत फोनवरुन संवाद ?
पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर आमदार कैलास पाटलांनी आदित्य ठाकरेंसोबत ओमराजे यांचे फोनवरून बोलणे करून दिल्याची सूत्रांची माहिती आहे. ज्यामुळे ओमराजे यांच्या राजकीय निर्णयामध्ये पुन्हा नवा ट्विस्ट आल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, या भेटीमागे खरोखरच केवळ सदिच्छा होती की पडद्यामागे काही मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर पुढे कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे आता राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.






