Wai: गावठी पिस्तुल बाळगणारे दोन जण गजाआड
Wai वाई-सुरूर रस्त्यावर शेंदुरजणे हद्दीत कॅनॉल परिसरात एक युवक पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना गुरुवारी (दि. 17) दुपारी बातमीदारामार्फत मिळाली.

Wai: वाई परिसरात दोन पिस्तुल बाळगून, दहशत निर्माण करणार्या सुदेश दीपक पाटणे आणि अक्षय विलास देसाई यांना वाई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे असा एक लाख 40 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाई-सुरूर रस्त्यावर शेंदुरजणे हद्दीत कॅनॉल परिसरात एक युवक पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना गुरुवारी (दि. 17) दुपारी बातमीदारामार्फत मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पोलिसांनी दुपारी 12.30 पासून परिसरात सापळा रचला. सुदेश पाटणे हा सायंकाळी 5.30 च्या सुमारास संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन, अंगझडती घेतली असता देशी बनावटीचे गावठी पिस्तुल सापडले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, ते पिस्तुल स्वप्निल ऊर्फ सोन्या प्रदीप जगताप याच्याकडून घेतल्याची माहिती त्याने दिली. अक्षय देसाई यानेही जगताप याच्याकडून पिस्तुल घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी अक्षयचा वाई परिसरात शोध सुरू केला. तो रात्री उशिरा परखंदी रस्ता चौकात आढळला. पोलिसांना पाहताच, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्या अंगझडतीत गावठी पिस्तुल व पाच जिवंत काडतुसे सापडली.
या दोघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, मंगळवार, दि. 22 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर व पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पोलीस अंमलदार हेमंत शिंदे, सोमनाथ टिके, विक्रम धोत्रे, विशाल शिंदे, नितीन कदम, हणमंत गाडे व प्रियांका कदम यांनी ही कारवाई केली.





