एकाच वेळी दोन चक्रीवादळे

पुणे – गेल्या आठवड्यात एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण झाली, जी सहसा होत नाहीत. यापूर्वी असे फक्त तीन वेळा घडले. मात्र, गेल्या सहा वर्षांत हे तिसऱ्यांदा घडत आहे. या घटना दुर्मिळातील दुर्मीळ असल्याचे निरीक्षण हवामानशास्त्र विभागाने नोंदवले आहे.
हवामान खात्याने आपल्या दि. 27 ऑक्टोबर रोजीच्या साप्ताहिक अहवालात सांगितले, की “दि.16 ते 20 ऑक्टोबरदरम्यान अरबी समुद्रात “तेज’ चक्रीवादळ निर्माण झाले, जे दि. 23 ऑक्टोबर रोजी येमेनच्या किनारपट्टीवर धडकले. त्याचवेळी दि. 21 ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ तयार झाले.
ज्याचे नाव “हमून’ असे होते. हे चक्रीवादळ दि. 24 ऑक्टोबर रोजी बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकले. दरम्यान, दोन चक्रीवादळे एकाच वेळी निर्माण होण्याची स्थिती सहसा नसते. पण, यापूर्वी दि. 9 नोव्हेंबर 1977 रोजी चक्रीवादळ निर्माण झाले होते. ज्याचा आंध्र प्रदेशवर परिणाम झाला. तर दुसरे चक्रीवादळ 14 नोव्हेंबर रोजी तयार झाले, ज्यामुळे तामीळनाडूला फटका बसला. पुढे ते वादळ अरबी समुद्रात पोहोचले आणि तेथून कर्नाटकच्या दिशेने गेले.
यानंतर, 2018 मध्ये अशीच स्थिती निर्माण झाली होती. तेव्हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी चक्रीवादळ तयार झाले. या चक्रीवादळांना “लुबान’ आणि “तितली’ असे नाव देण्यात आले होते. लुबानची निर्मिती अरबी समुद्रात झाली आणि तितली बंगालच्या उपसागरात तयार झाली. लुबानने येमेनवर, तर तितलीने ओडिशावर परिणाम केला. तेव्हाही भारतीय हवामान खात्याने ही अत्यंत दुर्मिळ घटना म्हणून वर्णन केले होते.





