पाकिस्ताननच्या कोर्टाने सोडले दोनशे दहशतवादी

पेशावर: पाकिस्तानच्या पेशावर हायकोर्टाने दहशतवादाच्या आरोपाखाली कारागृहात असलेल्या दोनशे दहशतवाद्यांनी सोडण्याचा आदेश दिला आहे. लष्करी कोर्टाने या दोनशे लोकांना दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली कारावासाची शिक्षा दिली होती.
तथापी पेशावर हायकोर्टाच्या खंडपीठाने ही शिक्षा रद्दबातल ठरवून त्यांची कारागृहातून आज सुटका केली. हायकोर्टाचा हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या दोनशे जणांच्या मुक्ततेचे आदेश देण्यात आले आहेत त्यातील अनेकांना फाशीची व आजन्म कारावासाची शिक्षा लष्करी न्यायालयाने ठोठावली होती.
लष्करी न्यायालयाने केवळ आरोपींच्या कबुली जबाबाच्या आधारे ही शिक्षा ठोठावली असून त्यांना बचावाची कोणतीही संधी दिली नाही असा दावा हायकोर्टाने आपल्या निकालपत्रात केला आहे.
या दोनशे जणांची सुटका करूनच पेशावरचे हायकोर्ट थांबलेले नाही तर लष्करी कोर्टाने दोषी ठरवलेल्या अन्य शंभर जणांचे रेकार्डही त्यांनी मागवून घेतले आहे. आज सोडून देण्यात आलेले अनेक जण गेल्या पाच ते दहा वर्षांपासून कारागृहात आहेत.
तालिबानने लष्कराच्या एका शाळेवर हल्ला करून दीडशे जणांना तेथे ठार मारल्याची घटना घडल्यानंतर पाकिस्तान सरकारने जानेवारी 2015 ला हे लष्करी न्यायालय स्थापन केले होते. त्यांनी दिलेल्या या शिक्षेला सर्वच आरोपींनी हायकोर्टात आव्हान दिले होते. आज सोडून दिलेल्या दहशतवाद्यांपैकी अनेकांचा लष्करी शाळेवरील हल्ल्याच्या घटनेत थेट हात असल्याचा आरोप आहे.



