मुंबईतील दोन हॉटेल्स बनली प्रमुख राजकीय केंद्रं; महाविकास आघाडी अन् भाजपच्या आमदारांचा मुक्काम

मुंबई -अतिशय चुरशीच्या आणि राजकीय प्रतिष्ठेच्या बनलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजपने आपापल्या आमदारांना येथील दोन पंचतारांकित हॉटेलांमध्ये हलवले आहे. त्यामुळे ती हॉटेल्स प्रमुख राजकीय केंद्रं बनली आहेत.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 6 जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे. एकूण 7 उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक अतिशय अटीतटीची बनली आहे. सहावी जागा मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारी शिवसेना आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातून घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आपले आमदार फुटणार नाहीत याची दक्षता घेण्याबरोबरच अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांना आपल्याकडे खेचण्याची चढाओढही सुरू झाली आहे.
निवडणुकीत कुठला दगाफटका होणार नाही यासाठी सर्वच प्रमुख पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. त्यातून महाविकास आघाडीचे घटक असणाऱ्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेल ट्रायडेंटमध्ये हलवले आहे. तर, भाजपचे आमदार हॉटेल ताजमध्ये तळ ठोकून आहेत. दोन्ही हॉटेल्समध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे.
जवळपास दोन दशके महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुका बिनविरोध होत होत्या. यावेळी तो पायंडा मोडला जाऊन प्रत्यक्ष निवडणूक होत असल्याने प्रमुख पक्षांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अपक्ष आणि लहान पक्षांचे किती आमदार कुठल्या बाजूने ते चित्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीचा सस्पेन्स आणखीच वाढला आहे.




