तुटलेल्या तारांमुळे दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; गावकऱ्यांचा रास्ता रोको

छ. संभाजीनगर – तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून शेतात मशागत करणाऱ्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. चिकलठाणा परिसरात जुना बीड रोडवर ही दुर्घटना घडली. कचरू जनार्दन दहीहंडे (वय ५४) व बाळू जगन्नाथ दहीहंडे (वय २८) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. या घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी जालना रोडवर दोन तास रास्ता रोको केला.
कचरु दहीहंडे व बाळू दहीहंडे शेतात खरीप हंगामासाठी मशागतीच्या कामासाठी गेले होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांचा तुटलेल्या वीजवाहिनीला स्पर्श झाला आणि विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला. परिसरातील शेतकरी व नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. वादळी वाऱ्यामुळे शेतातून जाणारी उच्चदाबाची वीज तार १५ दिवसांपूर्वी तुटली होती.
याबाबत नागरिकांनी सूचना करुनही महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळेत दुरुस्ती केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा बळी गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, संतापलेल्या नागरिकांनी जालना रोडवर रास्ता रोको केल्यामुळे दोन्ही बाजूने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. संतापलेल्या नागरिकांनी कुणालाही जुमानले नाही. आमदार नारायण कुचे यांच्यासह काही राजकीय कार्यकर्त्यांनी नागरिकांसह ठिय्या मारला.
त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. महावितरणच्या अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी निदर्शकांनी केली. पोलिसांनी मध्यस्थी करीत जमावाला शांततेचे आवाहन केले. तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.





