बीडमध्ये दोन कारची समोरासमोर धडक; तिघांचा जागीच मृत्यू

बीड : बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना केज तालुक्यातील अहमदपूर-अहमदनगर महामार्गावर शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने काही काळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
अमित दिलीपराव कोमटवार (वय ३५, रा. दिंद्रुड, माजलगाव), परमेश्वर नवनाथ काळे ( रा. खांडे पारगाव, बीड), गणपत नारायण गोरे (वय- ४७, रा. सामनापुर ता. जि. बीड) अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील कार क्रमांक (एम एच-२३/ई ६८५२) आणि (एम एच-१२/एम डब्ल्यू-३५६३) यातील वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात परमेश्वर काळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमित कोमटवार आणि गणपत नारायण गोरे हे गंभीर जखमी झाले होते.
अपघाताची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार शेंडगे, हेडकॉन्स्टेबल पठाण, हेडकॉन्स्टेबल वारे अपघातस्थळी दाखल झाले. पोलिसांनी परमेश्वर काळे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. तर गंभीर जखमी अमित कोमटवार आणि गणपत नारायण गोरे यांना आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.





