पणजी – हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे या कथित हत्येप्रकरणी गोवा पोलिसांनी रात्रभर चौकशी केली. सुधीर सागवान आणि सुखविंदर वासी अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सोनाली फोगटच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सोनाली फोगट यांचा मृत्यू अनैसर्गिक होता अशी माहिती शवविच्छेदन अहवालातून मिळाली आहे. सुरवातीला हा मृत्यू हदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची माहिती देण्यात आली होती. सोनाली फोगट गोव्यात आल्यापासून ज्यांनी त्यांची भेट घेतली किंवा त्यांना पाहिले त्या सर्वांचे जबाब नोंदवले जात आहेत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही कोणतीही शक्यता नाकारत नाही, असेही ते म्हणाले.