पुण्यातील ‘या’ रुग्णालयात झाले एकूण करोना मृतांपैकी अडीच हजार मृत्यू

पुणे – शहरातील एकूण करोनाबाधित मृतांमधील अडीच हजार मृत्यू एकट्या ससूनमध्ये झाले असून, सुमारे पावणेसहाशे जणांचे मृत्यू हे ससूनमध्ये दाखल करण्यापूर्वी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
शहरातील बाधितांच्या मृत्यूची संख्या गेल्या काही दिवसांत वेगाने वाढली आहे. त्यातून पुणे हे संपूर्ण राज्यातच हॉटस्पॉट झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर पुण्यातील मृतांचा आकडा सहा हजारांपेक्षा जास्त झाला आहे. त्यातून ससून रुग्णालयातील मृतांची आजपर्यंतची संख्या अडीच हजारांपेक्षा जास्त झाली आहे.
संपूर्ण जिल्ह्यातून ससूनमध्ये उपचारासाठी नागरिक येतात. त्यातूनही क्रिटीकल रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करून घेतले जात नाही, त्यांना ससूनमध्ये पाठवले जाते. त्यामुळे गंभीर अवस्थेतच येथे रुग्णांना दाखल केले जाते. असा रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मृतांची संख्याही येथे जास्त दिसत आहे.
सध्या ससूनमध्ये 477 रुग्ण दाखल असून, याशिवाय “सारी’ आजाराचे 184 रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासांत ससूनमध्ये 46 बाधितांचे मृत्यू झाले असून, त्यातील 10 मृत्यू हे रुग्णालयात येण्यापूर्वीच झाल्याचे ससूनने जाहीर केलेल्या आकडेवारीतून दिसून येते.





