चेंगराचेंगरीची स्वतंत्र चौकशी व्हावी; टीव्हीके पक्षाने घेतली मद्रास उच्च न्यायालयात धाव

चेन्नई : तमिळ अभिनेते विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. चेंगराचेंगरी दुर्घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी टीव्हीकेने केली आहे. तमिळनाडूतील करूरमध्ये शनिवारी विजय यांची सभा झाली. त्या सभेवेळी चेंगराचेंगरी होऊन मोठी जीवितहानी झाली. त्यानंतर टीव्हीकेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
दुर्घटनेची चौकशी सीबीआय किंवा विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) मार्फत करण्याचे साकडे त्या पक्षाने घातले आहे. दरम्यान, चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या एका व्यक्तीनेही न्यायालयात स्वतंत्रपणे याचिका दाखल केली. दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी, जबाबदारी निश्चित केली जावी, अशा मागण्या संबंधित व्यक्तीने केल्या आहेत.
चौकशी पूर्ण होईपर्यंत, प्रभावी सुरक्षाविषयक निकषांची निश्चिती होईपर्यंत विजय यांना पुढील सभा घेण्यास परवानगी दिली जाऊ नये. तसे आदेश पोलिसांना देण्यात यावेत, अशी विनंतीही जखमी व्यक्तीने केली आहे. त्यामुळे विजय यांच्या सभेतील चेंगराचेंगरीवरून न्यायालयीन लढा होण्याची चिन्हे आहेत. आता न्यायालय काय निर्णय देणार याविषयी उत्सुकता असेल.





