पिंपरी | चिंचवडसह भोसरी विधानसभा मतदार संघात तुतारीच

पिंपरी, (प्रतिनिधी) – चिंचवड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाना काटे आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अपक्ष लढणारे राहुल कलाटे यांच्यात रस्सीखेच सुरू होती. अखेर महाविकास आघाडीतून शरद पवार गटाकडून राहुल कलाटे यांची आज उमेदवारी जाहीर करण्यात आली.
त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे शंकर जगताप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राहुल कलाटे असा सामना रंगणार आहे. तर भोसरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अजित गव्हाणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भोसरीमध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे विरुद्ध राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे अशी लढत होणार आहे.
चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरून चर्चा सुरू होती. चिंचवड विधानसभा मतदारसंघात अजित पवार पक्षाचेे नाना काटे व राहुल कलाटे यांच्यात उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस होती.
भोसरी विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे रवी लांडगे, सुलभा उबाळे व राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांची नाव स्पर्धेत होती. अखेर तिसर्या यादीत चिंचवडमधून राहुल कलाटे व भोसरी विधानसभा मतदारसंघातून अजित गव्हाणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे विरुद्ध शरदपवार गटाचे अजित गव्हाणे असा सामना रंगणार आहे.
महायुतीच्या उमेदवारांच्या पिंपरी, चिंचवड व भोसरी ता तीनही विधानसभा मतदार संघातील उमेदवार जाहीर होऊन, या उमेदवारांच्या प्रचारालादेखील सुरुवात झाली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर करण्यात विलंब होत असल्याने इच्छुकांनी मुंबई गाठत, उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. तर काही दिवसांपुर्वी हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केलेले मोरेश्वर भोंडवे यांच्यासह माजी नगरसेवक नाना काटे व राहूल कलाटे हेदेखील चिंचवडमधून इच्छुक होते.
महायुतीच्या जागा वाटपात भाजपच्या वाट्याला चिंचवड विधानसभा मतदार संघ आल्याने नाराज झालेले नाना काटे यांच्यासह अनेक जण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते.
राष्ट्रवादीच्गया तुतारी चिन्हावर निवडणूक लढविण्याचे त्यांनी प्रसारमध्यम प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले होते. तर बाजी मारत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळविण्यात राहूल कलाटे यशस्वी झाले आहेत.
तीनही विधानसभेच्या जागा राष्ट्रवादीला
महायुतीच्या जागा वाटपात भोसरी व चिंचवड भाजपला तर व पिंपरी विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वाट्याला आला आहे. तर महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना पदाधिकार्यांनी भसोरी मतदार संघावर दावा केला होता.
त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्नदेखील सुरू होते. मात्र, पिंपरी, चिंचवड व भोसरी हे तीनही मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याचे जागा वाटपावरून स्पष्ट झाले आहे.





