बारामतीत अपक्ष उमेदवाराला दिलं ‘तुतारी’ चिन्ह; सुप्रिया सुळे म्हणाल्या – ‘हे तर षडयंत्र आहे’

Baramati Lok Sabha Election 2024 – बारामती लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या जागेसाठी 50 जणांनी उमेदवारी अर्ज भरला होता. 20 एप्रिलला छाननी झाली त्यानंतर 46 अर्ज वैध ठरले. तर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही जणांनी अर्ज मागे घेतले आणि आता 38 जण मैदनाता आहे. या उमेदवारांना सोमवारी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे.
38 उमेदवारांपैकी एका अपक्ष उमेदवार सोयल शहा युनूस शहा शेख यांना ‘तुतारी’ हे निवडणुकीसाठी चिन्ह देण्यात आले आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या तुतारी फुंकणारा माणूस या निवडणूक चिन्हावर लढत आहेत. त्यामुळे ‘तुतारी’ आणि ‘तुतारी फुंकणारा माणूस’ या दोन्ही चिन्हांवरून मतदारांमध्ये संभ्रम होण्याची शक्यता आहे.
यावरुन सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे माझ्या विरोधात षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून असं करू नये हा आमच्या वरती अन्याय आहे असं सांगितलेलं आहे. हा अन्याय दोन्ही उमेदवारांवर असून अपक्ष उमेदवार शेख यांच्यावर देखील हा अन्याय आहे. एक तर शेख हे बीडचे कोण गृहस्थ आहेत जे बारामतीमध्ये लढायला आले आहेत. ते कोण आहेत? कुठून आलेत ? हे आम्हाला माहिती नाही परंतु हा त्यांच्या वरती आणि माझ्यावरती ही अन्याय आहे. सांगायचं झालं तर हा रडीचा डाव असल्याचा आरोप देखील सुप्रिया सुळे यांनी केला.
आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. मात्र अशा प्रकारची घटना वर्धा येथे देखील घडली आहे. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन उमेदवार उभा आहे. तिथेच तुतारी हे चिन्ह एखाद्या अपक्ष उमेदवाराला दिलं गेलं आहे. त्यामुळे अर्थातच हे आमच्या विरोधात षडयंत्र आहे. वर्धा येथे अशा प्रकारे जेव्हा आक्षेप घेण्यात आला तेव्हा ते चिन्ह विड्रॉ करून मागे घेण्यात आलं. वर्ध्याला मान्य केला असताना बारामती मध्ये हे चिन्ह देणे चुकीचे असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदार संघात जरी 38 उमेदवार निवडणूकीच्या मैदनात असले तरीही येथे महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अर्थात नणंद भावजय असा सामना पहायला मिळणार आहे.





