Turkey Erdogan : …तरी पाकिस्तानला मदत करतच राहणार, तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला

Turkey Support for Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जोरदार कारवाई करत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतरही पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण भारताने सर्व डाव चोखपणे परतवून लावले.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तुर्कीने भारताविरोधात उघडपणे पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली आहे. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या नुकसानीचा विचार न करता तुर्की पाकिस्तानला मदत करतच राहणार असल्याचे म्हणत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, “पाकिस्तान आमचा भाऊ आहे, आम्ही त्याच्या मदतीला नेहमी धावू.” त्यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी ट्विट करत स्पष्टपणे म्हटले होते की, “चांगल्या आणि वाईट काळात आम्ही नेहमीच पाकिस्तानसोबत उभं राहू.” त्यानंतर आता पुन्हा एकदा एर्दोगन यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या संभाव्य नुकसानीकडे दुर्लक्ष करत, तुर्की पाकिस्तानला मदत करतच राहील, असं म्हटलं आहे.
याआधी केलेल्या एका ट्विटमध्येही त्यांनी म्हटले होते की, “पाकिस्तानमधील आमच्या बंधुभावांच्या लोकांसोबत आम्ही सदैव उभे राहू.” द्वेष किंवा राजकीय तोल सांभाळण्याऐवजी तुर्कस्तानकडून आता पाकिस्तानला छुप्या मदतीऐवजी उघड पाठिंबा दिला जात आहे. या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया देत तुर्कस्तानचे आभार मानले आहेत.
विशेष म्हणजे, इराणसारख्या इतर मुस्लिमबहुल देशांनी भारताविरोधात अशी भूमिका घेतलेली नाही. पण तुर्कीचा पाकिस्तानला समर्थन देण्यामागे त्यांचा वाढता संरक्षण व्यापार आणि जागतिक प्रभाव वाढवण्याची रणनीती आहे. तुर्की सध्या जगातील 11वा सर्वात मोठा शस्त्रास्त्र निर्यात करणारा देश बनला आहे. 2019-2023 या काळात त्याच्या संरक्षण निर्यातीत तब्बल 106% वाढ झाली आहे.





