Tumbbad 2: ‘तुम्बाड २’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची दमदार एंट्री; हस्तरच्या दुनियेत सोहम शाहसोबत रंगणार नवा थरार
Tumbbad 2 २०१८ साली प्रदर्शित झालेल्या तुम्बाड या चित्रपटाने वेगळ्या कथानकामुळे आणि गूढ वातावरणामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ‘हस्तर’ या रहस्यमय पात्राभोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकांना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेली.

Tumbbad 2: बहुचर्चित ‘तुम्बाड २’ या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. प्रेक्षक ज्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते, त्या चित्रपटात आता दमदार अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांची अधिकृत एंट्री झाली आहे. निर्माते आणि अभिनेता सोहम शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही घोषणा केली. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे.
२०१८ साली प्रदर्शित झालेल्या तुम्बाड या चित्रपटाने वेगळ्या कथानकामुळे आणि गूढ वातावरणामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ‘हस्तर’ या रहस्यमय पात्राभोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकांना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेली. चित्रपटाला सुरुवातीला मर्यादित प्रतिसाद मिळाला असला, तरी नंतर तो कल्ट फिल्म ठरला. री-रिलीज झाल्यानंतरही प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला.
आता ‘तुम्बाड २’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी सहभागी होणार असल्याने चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. सोहम शाह यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबतचे दोन फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये दोघेही काळ्या पोशाखात दिसत आहेत. त्यांच्या हातात ‘तुम्बाड’शी संबंधित काही प्रॉप्सही दिसतात.
View this post on Instagram
या पोस्टसोबत सोहम शाह यांनी लिहिले की, “आपल्या काळातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक नवाजुद्दीन सिद्दीकी ‘तुम्बाड २’मध्ये सहभागी झाले आहेत. नवाज भाई, तुमचं स्वागत आहे.” या घोषणेनंतर चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला. अनेकांनी नवाजुद्दीन सिद्दीकी यांना शुभेच्छा दिल्या, तर काहींनी चित्रपटाबद्दल आपली उत्सुकता व्यक्त केली.
नवाजुद्दीन सिद्दीकी हे त्यांच्या वास्तववादी आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखले जातात. गंभीर, गूढ आणि वेगळ्या भूमिका साकारण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे ‘हस्तर’च्या गूढ आणि भयावह जगात त्यांची भूमिका कशी असेल, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यांच्या पात्राबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सोहम शाह हे या चित्रपटाचे प्रमुख चेहरा आहेत. पहिल्या भागात त्यांनी साकारलेली भूमिका खूप गाजली होती. आता दुसऱ्या भागात नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत त्यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. दोघेही दमदार कलाकार असल्याने पडद्यावर त्यांची केमिस्ट्री कशी रंगते, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
tumbaad 2
‘तुम्बाड’ला मिळालेल्या यशानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. कथा, वातावरण, संगीत आणि अभिनय या सगळ्यांनी पहिल्या भागात वेगळा ठसा उमटवला होता. त्यामुळे ‘तुम्बाड २’ त्या अपेक्षांवर खरा उतरेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या चित्रपटाच्या शूटिंगबाबत किंवा रिलीज डेटबाबत अधिक माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या एंट्रीमुळे चित्रपटाबद्दलची चर्चा रंगली आहे. ‘हस्तर’च्या गूढ जगात आता कोणता नवा थरार उलगडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.





