Tulja Bhavani Temple : तुळजाभवानी मंदिर समितीने सिम्बायोसिसशी केला करार

धाराशिव : येत्या काळात धाराशिव जिल्ह्यात अपारंपारिक ऊर्जा, टेक्निकल टेक्स्टाईल उत्पादन, कृषिपूरक उद्योग त्यासोबतच पर्यटन वाढीला मोठा वाव मिळणार आहे. स्थानिक युवकांना जिल्ह्यातच हक्काच्या रोजगार संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी आपण तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात कौशल्य विकास विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
पुणे येथील जगप्रसिद्ध सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यवसायिक विद्यापीठाकडून त्यासाठी तांत्रिक सहकार्य घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार तुळजाभवानी मंदिर समितीने सिम्बायोसिस कौशल्य विकास विद्यापीठासोबत तांत्रिक सहकार्य कराराची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
धाराशिव जिल्ह्यात महायुती सरकारच्या माध्यमातून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या सहकार्याने अनेक महत्वाचे प्रकल्प मोठ्या गतीने पुढे जात आहेत. विविध योजना, प्रकल्प, उद्योग आणि पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्यात ३५ हजार रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यानुसार पुढील एक-दोन वर्षात आपल्याला मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ लागणार आहे.
त्यासाठी स्थानिक युवकांना आधुनिक, एकात्मिक आणि व्यापक असे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन कौशल्यधारीत शिक्षणाद्वारे रोजगारक्षम बनविण्यासाठी तुळजापुरात कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना आपण मांडली होती. ती पूर्णत्वाला नेण्यासाठी सिम्बायोसिस कौशल्य विकास विद्यापीठ आणि तुळजाभवानी मंदिर समिती यांच्यात कौशल्य विद्यापीठ उभारणीसाठी तांत्रिक सहकार्य कराराची प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली. त्यामुळे रोजगार निर्मितीच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण टप्पा आपण पूर्ण केला आहे.




