धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणाऱ्या 8 पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानने कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. मंदिराच्या शिस्तीला बाधा निर्माण करणाऱ्या अशोभनीय वर्तनामुळे संबंधित पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, तीन महिन्यांसाठी मंदिरप्रवेश बंदीची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित पुजाऱ्यांनी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे आढळून आले आहे. यामुळे मंदिर प्रशासनाने तातडीने दखल घेत, देऊळ कवायत कलम २४ आणि २५ अन्वये संबंधितांवर नोटीस बजावली आहे. मंदिर प्रशासनाने नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे की, पुजारी व्यवसायास अशा प्रकारचे वर्तन शोभणारे नसून, मंदिर परिसरातील पावित्र्याला बाधा पोहोचवणारे आहे. यामुळे मंदिराचे कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन होत असून, शिस्तीचाही भंग होत आहे. नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा, मिळालेला खुलासा असमाधानकारक असल्यास तीन महिन्यांची मंदिरप्रवेश बंदी घालण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. कारणे दाखवा नोटीशीमध्ये वैभव विशाल भोसले, विशाल दादासाहेब मगर, लखन रोहिदास भोसले, विशाल हनमंत चव्हाण, विशाल बाळासाहेब गंगणे, अक्षय किशोर कदम-भैय्ये, राहुल हनुमंत पवार व धीरज राजू चोपदार या आठ पुजाऱ्यांचा समावेश आहे.