Pimpari : देहूकरांचा निरोप घेऊन तुकोबारायांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ

श्रीक्षेत्र देहू : अभंगाच्या पंक्ती गुणगुणत श्रीविठ्ठल भक्तीच्या ओढीने ‘ज्ञानोबा..माऊली..तुकाराम’चा नामघोष करीत टाळ, चिपळ्या, मृदुंगाच्या गजरात वैष्णवांचा मेळा जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र देहूतून फुलांच्या वर्षावात देहूकरांचा भावपूर्ण निरोप घेत पंढरीकडे मार्गस्थ झाला. आपले निस्सिम मुस्लिम भक्त अनगडशहाबाबाच्या दर्ग्याला भेट देऊन.. सीओडी डेपोजवळ स्वागत स्वीकारत. शनी मंदिर जवळ विसावा घेत.. भारतीय सैन्य दलाला दर्शनाचा लाभ देत.. देहूरोड कॅन्टोन्मेंटचे स्वागत स्वीकारून गुरुवारी (दि. १९) सायंकाळी तुकोबारायांची पालखी उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात पोहोचली.
आषाढी पायी वारीकरिता बुधवारी (दि. १८) देहूतून प्रस्थान झालेली संत तुकाराम महाराजांची पालखी परंपरेप्रमाणे देहूतीलच इनामदार वाड्यात मुक्कामी होती. गुरुवारी (दि. १९) शासकीय महापूजेनंतर इनामदार वाड्यातून सकाळी साडेदहाच्या सुमारास पालखी तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
इनामदार वाड्यात शासकीय महापूजा
इनामदार वाड्यात गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास महाराजांच्या पादुकांची विधीवत शासकीय महापूजा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व त्यांच्या पत्नी सुजाता, उपजिल्हाधिकारी डॉ. यशवंत माने व त्यांच्या पत्नी दैवशाला, पिंपरी-चिंचवडचे अप्पर तहसीलदार जयराज देशमुख व त्यांच्या पत्नी उज्ज्वला देशमुख आणि देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांच्या हस्ते संपन्न झाली.
यावेळी संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, संस्थानचे अन्य पदाधिकारी, विश्वस्त, नगराध्यक्षा पूजा दिवटे, नगरसेवक, नगरसेविका, नगरपरिषदेचे अभियंता संघपाल गायकवाड, ज्ञानेश्वर शिंदे, नगरपंचायतीचे अन्य अधिकारी, कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी
महापूजेनंतर सकाळी साडेदहा वाजता पालखीचे मुख्य चौपदार नामदेव गिराम यांनी पालखी सोहळा प्रमुखांच्या आदेशान्वये पालखीचे भोई यांना आदेश देताच भोई यांनी पालखी खांद्यावर घेतली. टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी इनामदार वाड्यातून बाहेर पडली. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी देहू पंचक्रोशीतील अबाल वृद्धांसह वारकरी पालखी मार्गावर दुतर्फा उभे होते. अभंग आरती होऊन पालखी इनामदार वाड्यातून बाहेर आली. यावेळी उपस्थित भाविकांनी ज्ञानोबा तुकाराम गजर करीत भजन सुरु केले.
साडेअकराला पालखी देहूतून बाहेर
देहूगाव परिसरात पहाटेपासून चांगलाच पाऊल पडत असल्याने हवेत गारवा होता. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. अशा वातावरणातही वारकऱ्यांचा उत्साह कमी झाला नाही. स्थानिक नागरिक आणि भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी इनामदार वाड्यासमोर गर्दी केली होती. तर ठिकठिकाणी पालखी दर्थनासाठी थांबवली जात होती. बरोबर साडेअकरा वाजण्याच्या सुमारास प्रवेशद्वार कमानीतून पालखी बाहेर येताच एक प्रदक्षिणा घालून पालखी देहूच्या वेशी बाहेर पडली.
श्रीविठ्ठल भेटीसाठी जगद्गुरू निघाले
देहूतील कापूर ओढा येथील अनगडशहावली दर्ग्याजवळ पालखी आल्यानंतर पहिली अभंग आरती बाळासाहेब काशीद, परंडवाल, बिरदवडे, वारघडे कुटुंबीय यांच्या हस्ते करण्यात आली. अभंग आरतीनंतर आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथामध्ये पालखी ठेवण्यात आली. इथे स्थानिक ग्रामस्थांसह सोहळ्यातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आरती होताच देहू परिसरातील भाविकांनी पालखीला भावपूर्ण निरोप दिला व ते माघारी फिरले, आणि जगद्गुरू तुकोबाराय पालखीतून श्रीविठ्ठल भेटीसाठी तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाले.





