Sanjay Raut : मुंबईतील 26/11 च्या हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण झाली आहे. या भयावह हल्ल्यात अनेक निरपराध लोकांचा बळी गेला. तसेच दहशतवाद्यांशी लढताना लावताना काही पोलिस शहीद झाले. याबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावरून संजय राऊत यांनी काही राजकीय नेत्यांवर निशाणा साधला आहे. मुंबई कमजोर करण्याचे प्रयत्न तेव्हा पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केले. आता काही राजकीय लोकं करतायेत. त्यांच्या हातात बंदूक, बॉम्ब नसतील पण काहीही करून त्यांना मुंबई अस्थिर आणि विकलांग करून या शहराचे महत्त्व कमी करायचे असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटले आहे. काय म्हणाले संजय राऊत ? “मुंबई विकलांग करण्याचे हे आंतरराष्ट्रीय कारस्थान होते. दहशतवाद्यांनी मुंबईच्या अनेक महत्त्वाच्या इमारतींवर, सार्वजनिक ठिकणांवर हल्ले केले. आमच्या पोलिसांनी झुंज दिली, हौताम्य पत्करलं आणि मुंबईचे रक्षण केले. मुंबई कमजोर करण्याचे प्रयत्न तेव्हा पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केले. आता काही राजकीय लोकं करतायेत. त्यांच्या हातात बंदूक, बॉम्ब नसतील पण काहीही करून त्यांना मुंबई अस्थिर आणि विकलांग करून या शहराचे महत्त्व कमी करत आहे. आजचा दिवस राजकीय चर्चेचा नाही. जे निरपराध नागरीक या हल्ल्यात मारले गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा आजचा दिवस आहे. जे पोलीस अधिकारी, शिपाई शहीद झाले त्यांना अभिवादन करण्याचा आज दिवस आहे.” यावेळी संजय राऊत यांनी संविधान दिनाबाबत देखील भाष्य केले. “संविधानामुळे देशातील लोकशाही आणि स्वातंत्र्य मजबूत राहिले. पण गेल्या १० वर्षापासून नक्कीच संविधानाचे खासगीकरण सुरू आहे. संविधान कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संविधानात हवे तसे आपल्या सोयीने बदल करून खासगी संविधान देशावर लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. संविधान वाचवण्याची जबाबदारी देशातील प्रत्येक नागरिकांवर असून 2024 ची राजकीय लढाई ही देशातील संविधान वाचवण्यासाठीच होईल.” असे संजय राऊत म्हणाले. मिझारोममध्ये भाजप जिंकणार नसून तिथे काँग्रेसचं अस्तित्व आहे. पण मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड इथं मोदींची जादू चालणार नाही हे सूर्यप्रकाशाइतके सत्य झालेले आहे. तेलंगणात भाजपा कुठेही स्पर्धेत नाही. छत्तीसगड, मध्य प्रदेशात भाजपाचा दारूण पराभव होणार आहे. राजस्थानात अशोक गहलोत हे जादूगार आहेत. गहलोत यांनी देशाच्या पंतप्रधानांना आव्हान दिले आहे. राजस्थानाची राजकीय समीकरणे अशी असतात जो ५ वर्ष राज्य करतो तो पुढच्यावेळी निवडून येत नाही. पण यावेळेला ते चित्र बदलेल,” असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.