राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तृप्ती सरोदे यांचा शिवसेनेत प्रवेश

शिरूर (न्हावरे): शिरूर ग्रामीण-न्हावरे गटात उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या तृप्ती सरोदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर ‘धनुष्यबाण’ हाती घेतल्याने राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
तृप्ती सरोदे या गेल्या अनेक महिन्यांपासून या गटात सक्रिय होत्या. जनसंपर्क आणि स्थानिक प्रश्नांवरील आक्रमक भूमिकेमुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, ऐनवेळी पक्षाने त्यांना डावलून वेगळा चेहरा समोर आणल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि निष्ठावंतांऐवजी धनशक्तीला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप सरोदे समर्थकांनी केला आहे.
“प्रामाणिक कामाची जिथे किंमत नाही, तिथे राहण्यात अर्थ नाही,” अशी रोखठोक भूमिका घेत सरोदे यांनी शिवसेनेची वाट धरली. यावेळी शिवसेनेकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष म्हणून आपण शिवसेनेत येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरोदे यांच्या या बंडखोरीमुळे शिरूरमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. त्यांचा तळागाळातील संपर्क आणि नाराज कार्यकर्त्यांची फळी यामुळे राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आता या मतदारसंघात ‘घड्याळ’ की ‘धनुष्यबाण’ वरचढ ठरणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.





