ट्रम्प तात्या झाले कर्जतचे रहिवाशी.! पांढरा बंगला, डोक्यावर फेटा…; रोहित पवारांनी 20 रुपयांत काढलं ट्रम्प यांचं आधार कार्ड

Rohit Pawar | Donald Trump Aadhaar Card : मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी मंगळवारी व बुधवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर आज (दि. १६ ) रोहित पवार यांनी गुरूवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत बोगस आधार कार्ड आणि मतदारयाद्यांचे कनेक्शन जोडले आहे.
या पत्रकार परिषदेत त्यांनी मतचोरीचे गंभीर आरोप केले आहेत. या कथित आरोपांप्रकरणी त्यांनी कुठल्या मतदारसंघात किती फेक मतदार वाढले, याबाबत आकडा सांगितला आहे. तसेच त्यांनी एकाच व्यक्तीचे मतदार याद्यांमध्ये अनेक वेळा नाव असल्याचा दावा केला. त्यामुळे त्या व्यक्तीने अनेकदा मतदान केलं असावं, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
दुबार मतदान, खोटे मतदार नोंदणीसाठी आधार कार्डचा सगळ्यात मोठा वापर झाल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी हेराफेरी कशी होते, हे दाखविले. या जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव माझ्या मतदारसंघात नोंदवू, असे सांगत रोहित पवार यांनी एका संकेतस्थळावर ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
रोहित पवारांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावे आधारकार्ड बनवून, त्यांचा पत्ता पांढरा बंगला कर्जत असे लिहिला, त्यांची जन्मतारीखही लिहिली. आणि थेट त्यांचे आधार कार्डच तयार करून दाखवलं. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
एका संकेतस्थळावरून १२३४५६७८९०१२ या क्रमांकाचे आधार कार्ड काढण्यात आले. त्यावर डोनाल्ड ट्रम्प तात्या हे नाव, फेटा घातलेला ट्रम्प यांचा फोटो, घर क्रमांक – ००७, गल्ली – पांढरा बंगला, गाव – राशीन, जन्मतारीख – १८२५, लिंग – स्त्री आदी अशी माहिती या संकेतस्थळावर भरण्यात आली होती. त्यानंतर अर्ज फी ऑनलाईन २० रुपये भरल्यानंतर ट्रम्प यांचे आधार कार्ड तयार झाले.
याच आधार कार्डच्या आधारे मतदार नोंदणी केली जाते. अशाचप्रकारे बोगस आधार कार्ढच्या आधारे अधिकारी डोळेझाकपणे नोंदणी करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. मतदार यादीतील घोळाविरोधात राज्यात विरोधक आक्रमक झालेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी मतचोरी कशी केली जातेय, हे प्रात्याक्षिकासह यावेळी दाखवून दिले.





