ट्रम्पच्या टॅरिफने झुकेरबर्ग-बेझोसला दिला मोठा झटका, अब्जावधी रुपये बुडाले, पण या व्यक्तीने खूप कमावला नफा

वाॅशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवे टॅरिफ जाहीर केल्यानंतर गुरुवारी जगातील ५०० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत तब्बल २०८ अब्ज डॉलर (सुमारे १७ लाख कोटी रुपये) ची घट झाली. या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी घसरण झाली, ज्याचा फटका अब्जाधीशांना बसला. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सच्या १३ वर्षांच्या इतिहासातील ही चौथी सर्वात मोठी एकदिवसीय घसरण असून, कोविड-१९ नंतरची सर्वात मोठी घट मानली जात आहे. इंडेक्सनुसार, ५०० पैकी निम्म्याहून अधिक अब्जाधीशांच्या संपत्तीत सरासरी ३.३% ची घट नोंदवली गेली.
अमेरिकी अब्जाधीशांना सर्वाधिक फटका
नव्या टॅरिफचा सर्वात मोठा परिणाम अमेरिकी अब्जाधीशांवर झाला. मेटाचे सीईओ मार्क जुकरबर्ग आणि ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले. मात्र, या संकटात मेक्सिकोचे सर्वात श्रीमंत उद्योगपती कार्लोस स्लिम यांना फायदा झाला. मेक्सिकन शेयर बाजारात ०.५% वाढ झाल्याने त्यांची संपत्ती ४% ने वाढून ८५.५ अब्ज डॉलरवर पोहोचली. अमेरिकेने टॅरिफ यादीत मेक्सिकोचा समावेश न केल्याने तिथल्या बाजारावर फारसा परिणाम झाला नाही.
जुकरबर्गला सर्वात मोठा धक्का
मेटाचे सीईओ मार्क जुकरबर्ग यांना सर्वाधिक नुकसान झाले. मेटाच्या शेअर्समध्ये ९% घसरण झाल्याने त्यांची संपत्ती १७.९ अब्ज डॉलरने कमी झाली. फेब्रुवारीपासून मेटाचे शेअर्स २८% खाली आले आहेत. दुसरीकडे, ॲमेझॉनच्या शेअर्समध्ये ९% घट झाली, जी एप्रिल २०२२ नंतरची सर्वात वाईट एकदिवसीय घसरण आहे. यामुळे जेफ बेजोस यांच्या संपत्तीत १५.९ अब्ज डॉलरची घट झाली.
मस्क यांचे ११० अब्ज डॉलर बुडाले
टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्या संपत्तीत यंदा आतापर्यंत ११० अब्ज डॉलरची घट झाली आहे. फक्त गुरुवारीच त्यांच्या नेटवर्थमध्ये ११ अब्ज डॉलरची घसरण झाली. टेस्लाच्या कमकुवत डिलिव्हरी आकडेवारी आणि मस्क यांच्या ट्रम्प यांच्याशी जवळीकीमुळे शेअर्स ५.५% घसरले.
इतर अब्जाधीशांनाही फटका
कारवाना कंपनीचे सीईओ अर्नेस्ट गार्सिया III यांच्या संपत्तीत १.४ अब्ज डॉलरची घट झाली, कारण कंपनीच्या शेअर्समध्ये २०% घसरण झाली. शॉपिफाईचे सीईओ टोबी लुटके यांना १.५ अब्ज डॉलर (१७%) चे नुकसान झाले, त्यांच्या शेअर्समध्येही २०% घट झाली. युरोपियन युनियनने अमेरिकेला २०% टॅरिफ लादण्याची तयारी केल्याने मद्य आणि लक्झरी वस्तू उद्योगाला धक्का बसला. एलव्हीएमएचचे सीईओ बर्नार्ड अर्नाल्ट यांची संपत्ती ६ अब्ज डॉलरने कमी झाली, तर चिनी फुटवेअर निर्माते झांग कोंगयुआन यांना १.२ अब्ज डॉलरचा फटका बसला.
पुढे काय?
अमेरिका आणि चीनमधील वाढत्या टॅरिफ युद्धामुळे बाजारात आणखी अस्थिरता येण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, टॅरिफ युद्ध सुरू राहिल्यास पुरवठा साखळीवर परिणाम होईल आणि ग्राहकांना महागाईला सामोरे जावे लागेल.





