ट्रम्पचा टॅरिफ झटका, रिझर्व बँकेचा तातडीचा निर्णय! व्याजदर कायम, दिवाळीत कपात होण्याची शक्यता

मुंबई – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह विविध देशाविरोधात 10 ते 50 टक्के आयात शुल्काची घोषणा केली आहे. त्याचबरोबर भारताने रशियाकडून क्रूड खरेदी केल्यास दंड लावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. अशा परिस्थितीत भारताला खनिज तेलाची आयात महागात पडू शकते. त्याचा परिणाम महागाई वाढण्यात होऊ शकतो. त्यामुळे परिस्थितीपूर्व खबरदारीची उपायोजना म्हणून रिझर्व बँकेच्या पत धोरण समितीने व्याजदर जैसे थे पातळीवर ठेवण्याचा निर्णय घेतला.
मात्र भारताची स्थूल अर्थव्यवस्था कमालीची बळकट आहे. एवढेच नाही तर भारताचा विकासदर जगात सर्वात जास्त आहे. जागतिक विकास दरात भारताचे योगदानही सर्वात जास्त आहे. त्यामुळे यावर्षी भारताचा विकासदर 6.5% राहील या पूर्वीच्या अंदाजात रिझर्व बँकेने कसलाही बदल केलेला नाही. व्याजदर मात्र 5.5% या पातळीवर कायम ठेवले आहेत. रिझर्व बँकेने रोख -राखीव प्रमाण ठरविणारा दरही पूर्वीच्या पातळीवर कायम ठेवला आहे. या अगोदरच्या पत धोरणात हा दर एक टक्क्याने कमी केला होता. त्याची अंमलबजावणी डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे.
फेब्रुवारीपासून रिझर्व बँकेने व्याजदरात तीन टप्प्यात एक टक्का कपात केली आहे. याचा पूर्ण फायदा व्यावसायिक बँकांनी अजूनही ग्राहकांना दिलेला नाही. यासाठी आणखी बराच कालावधी लागू शकतो. अशा परिस्थितीत सध्या व्याजदर कपातची गरज पडणार नाही, असे पत धोरण समितीच्या सर्व सदस्यांना वाटले. पुढील पत धोरणात म्हणजे ऑक्टोबरच्या सुरुवातीला व्याजदरात कपात करण्याची शक्यता खुली आहे. त्यामुळे भारतात दिवाळी- दसर्याच्या सुमारास नागरिकांना स्वस्त भांडवल उपलब्ध होऊन खरेदी वाढण्याची शक्यता खुली राहील. दरम्यानच्या काळात जागतिक परिस्थितीत काय बदल होतो, याकडे रिझर्व बँकेचे लक्ष राहणार आहे.
उद्योग क्षेत्राकडून पतधोरणाचे स्वागत
रिझर्व बँकेने अगोदरच पुरेशी व्याजदर कपात केली आहे. याचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. देशातील आणि परदेशातील एकूण परिस्थिती पाहता यावेळी रिझर्व बँकेचा व्याजदरात बदल न करण्याचा निर्णय योग्य आहे असे उद्योग जगताने म्हटले आहे. शिवाय अगोदरच्या व्याजदर कपातीचा पूर्ण लाभ ग्राहकांना मिळालेला नाही. दरम्यानच्या काळात परिस्थिती सुधारल्यास व्याजदर कपातीची शक्यता खुली ठेवण्यात आल्याबद्दल उद्योजकांनी समाधान व्यक्त केले.
- दृष्टिक्षेपात पतधोरण
-रेपो दर 5.5 टक्क्यावर कायम
-व्याजदरासंबंधातील निर्णय मतैक्याने
-विकासदर अंदाज 6.5 टक्क्यांवर कायम
-पहिल्या तिमाईचा विकासदर 6.5%
-दुसर्या तिमाईचा विकास दर 6.7%
-तिसर्या तिमाईचा विकासदर 6.6%
-चौथ्या तिमाहीचा विकासदर 6.3%
-वार्षिक पातळीवर महागाई 3.1 टक्के राहण्याचा अंदाज
-अगोदरच्या व्याजदर कपातीचा ग्राहकांना लाभ होण्याची गरज
-पुढील पतधोरण एक ऑक्टोबर रोजी
-देशांतर्गत स्थूल अर्थव्यवस्था बळकट
-कर्जरोख्यातील गुंतवणुकीसाठी एसआयपी
-चालू खात्यावरील तुट आवाक्यात
-व्यापार युद्धामुळे महागाई वाढणार नाही.





