ट्रम्पचा टॅरिफ बॉम्ब! भारतीय औषध कंपन्यांच्या शेअर्सना मोठा धक्का

नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही औषधाच्या आयातीवर 1 ऑक्टोबर पासून 100 टक्के आहे आयात शुल्क लावण्याचा निर्णय जाहीर केला. अशा परिस्थितीत अमेरिकेला निर्यात करणार्या भारतीय औषधी कंपन्यांच्या शेअरवर याचा नकारात्मक परिणाम झाला.
शेअर बाजारावर नोंदलेल्या बर्याच कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे आरोग्य क्षेत्राचा निर्देशांक 2.14 टक्क्यांनी कोसळून 43,046 अंकावर बंद झाला. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 1 ऑक्टोबर 2025 पासून ब्रँडेड आणि पेटंटेड औषधी उत्पादनावर अमेरिका 100 टक्के आयात शुल्क लावणार आहे. मात्र जर या कंपन्यांनी अमेरिकेत येऊन प्रकल्प उभारून त्यामध्ये औषधाची निर्मिती केली तर त्या कंपन्यांच्या औषधावर शुल्क लागण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
ज्या कंपन्या त्यांचे प्रकल्प अमेरिकेलांमध्ये उभारत असल्याचा पुरावा सादर करतलि, प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले असल्याचे स्पष्ट करतील त्यांच्या अमेरिकेत तयार होणार्या उत्पादनांना अमेरिका कसलेही शुल्क लावणार नसल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
इनरिच मनी या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पौमुदी आर यांनी सांगितले की, अमेरिकेने घेतलेल्या या नकारात्मक निर्णयाचा अपेक्षेप्रमाणे भारतीय औषधी उद्योगावर परिणाम झाला आहे. मात्र भारतातून जास्त प्रमाणात जेनेरिक औषधाची अमेरिकेला निर्यात केली जाते. ट्रम्प यांनी जारी केलेल्या पोस्टमध्ये जेनेरिक औषधाचा उल्लेख नाही. त्यामुळे कालांतराने भारतीय औषधी कंपन्यांच्या शेअरमध्ये सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयाचा भारतातील औषध उद्योगाबरोबरच चीन आणि इतर देशांच्या औषधी उद्योगावरही नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ट्रम्प यांनी औषधी उद्योगाला शुल्कातून वगळले होते. जेनेरिक औषधांना आतापर्यंत तरी शुल्कातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय औषधी उद्योगाच्या शेअर मर्यादित प्रमाणात कमी झाले. मात्र जर कालांतराने ट्रम्प यांनी जेनेरिक औषधावर शुल्क लावायचे ठरविले तर त्याचा भारतीय औषध उद्योगावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असे रेलिगेअर ब्रोकिंग या संस्थेचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले.





