मुंबई – अमेरिकेच्या आक्रमक व्यापार धोरणामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सरलेल्या आठवड्यात बरेच कमी झाले. अशा परिस्थितीत या आठवड्यामध्ये शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य 13 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. या आठवड्यात राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 2.5 टक्क्यांनी ,निफ्टी स्मॉल कॅप 3.3 टक्क्यांनी कोसळले. खनिज तेलाशी संबंध असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजला या आठवड्यात मोठा फटका बसला. शेअर बाजारांनी दिलेल्या आकडेवारीनुसार या आठवड्यामध्ये निफ्टी 645 अंकांनी म्हणजे 2.5 टक्क्यांनी तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 2,185 अंकांनी म्हणजे 2.5 टक्क्यांनी कोसळला. शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. रिअॅल्टी, वाहन, ग्राहक वस्तू क्षेत्राची या पडझडीमुळे मोठी हानी झाली. अशा परिस्थितीत राष्ट्रीय शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य या आठवड्यामध्ये 13.46 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. रशियाकडून तेल खरेदी करीत असल्याबद्दल भारत, चीन सारख्या देशावर 500% आयात शुल्क लावण्याचे विधेयक अमेरिकेच्या संसदेमध्ये सादर करण्यात आले आहे. या विधेयकाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठिंबा दिला आहे. या वृत्तानंतर सरलेल्या आठवड्यात शेअर बाजारात एकतर्फी विक्री झाली. विशेष म्हणजे अमेरिकन संसदेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाला मोठा विरोध आहे. हे विधेयक मंजूर होईल की नाही याबद्दल बर्याच शंका असतानाही गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेऊन नफेखोरी केली. या आठवड्यातील निफ्टी संदर्भातील ट्रेन्ट कंपनीचा शेअर 9.9 टक्क्यांनी, रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर 7.3 टक्क्यांनी, एचडीएफसी बँकेचा शेअर 6.3 टक्क्यांनी कोसळला. अदानी एंटरप्राएजेस कंपनीचा शेअर 5.5 टक्क्यांनी, इंडिगो कंपनीचा शेअर 5.1 टक्क्यांनी कमी झाला. मात्र या विक्रीच्या वातावरणातही एशियन पेंटस् कंपनीचा शेअर 1.4 टक्क्यांनी, ओएनजीसी कंपनीचा शेअर 1.2 टक्क्यांने वाढला. ओएनजीसीचे व्हेेनेझुएलात बरेच काम आहे. या अशा परिस्थितीत या कंपनीची अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीज कंपनीचा शेअर 0.9 टक्क्यांने, भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा शेअर 0.7 टक्क्यांने तर सिप्ला कंपनीचा शेअर 0.4 टक्क्यांने वाढला.