वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी युक्रेन आणि रशियाला ते जिथे आहेत तिथेच थांबा असे सांगून युद्ध तत्काळ थांबवण्याचे आवाहन केले. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा एकदा चर्चा केली. ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यापासून नऊ महिन्यांत संघर्षाबद्दलची त्यांची निराशा वारंवार समोर आली आहे. आता ट्रम्प युक्रेनला माघार घेऊन रशियाकडून गमावलेली जमीन परत मिळवण्याचा प्रयत्न देखील सोडून देण्यासाठी दबाव आणत असल्याचे दिसून आले. ट्रम्प यांनी झेलेन्स्की आणि त्यांच्या शिष्टमंडळासोबत जवळपास दोन तास चर्चा केली. ते जेथे आहेत, तेथेच त्यांनी आता थांबायला हवे. दोघांनीही आता स्वतःला विजयी घोषित करायला हवे. कोण जिंकले याचा निर्णय इतिहासालाच घेऊ द्यावे. पुरेसे रक्त सांडले गेले आहे, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दोन्ही बाजूंना युद्ध तात्काळ थांबवण्याचे आवाहन केले आणि रशियाने युक्रेनमधून ताब्यात घेतलेला प्रदेश आपल्या ताब्यात ठेवावा. तुम्ही युद्ध रेषेवरून जिथे असाल तिथेच थांबा. अन्यथा ते खूप गुंतागुंतीचे होईल, असे ट्रम्प यांनी सूचित केले. युक्रेन हे युद्ध जिंकू शकेल, असे गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या निमित्ताने ट्रम्प म्हणाले होते. गमावलेली भूमीदेखील युक्रेनला परत मिळवता येऊ शकेल, असेही ट्रम्प म्हणाले होते. मात्र आता त्यांच्या भूमिकेत पुन्हा बदल झाल्याचे दिसते आहे. आगोदर युक्रेनला टॉमहॉक क्षेपणास्त्रे देण्याचा विचार करत असलेल्या ट्रम्प यांनी आता हा विषय टाळायला सुरुवात केली आहे. आता युद्धबंदी आणि वाटाघाटीची वेळ आली आहे, असे शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर झेलेन्स्की म्हणाले. ट्रम्प यांनी युक्रेनला जमीन सोडण्यास भाग पाडल्याबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी थेट टाळाटाळ केली.