नवी दिल्ली – अमेरिकेच्या अध्यश्रीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी साऊथ कॅरोलिनामध्ये झालेल्या प्रायमरीमध्ये माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इच्छुक उमेदवारी निकी हेले यांचा पराभव केला आहे. निकी हेले या साऊथ कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर असूनही त्यांना आपल्या घरच्या मैदानावर पराभव स्वीकारावा लागला आहे. साऊथ कॅरोलिनाच्या गव्हर्नर असताना त्यांना जो पाठिंबा होता, तो प्रायमरीमध्ये त्यांना टिकवता येऊ शकला नाही. त्यांच्या प्रचार मुख्यालयाबाहेरही ट्रम्प समर्थकांकडून ट्रम्प यांच्याच विजयाची घोषणाबाजी केली जात असल्याचे चित्र बघायला मिळाले. तर ट्रम्प यांना सलग तिसर्या राज्यामध्ये विजय मिळाला आहे. आता रिपब्लिकन पक्षाची अंतिम उमेदवारी मिळवण्याची त्यांची वाट आणखीन सोपी झाली आहे. ट्रम्प यांना यापूर्वी आयोवा, नोवाडा, न्यू हॅम्पशाययर आणि यूएस व्हर्जिन आयलंडसमध्ये विजय मिळाला आहे. आता साऊथ कॅरोलिनामध्येही विजय मिळाल्याने निकी हेले यांच्यावरील दबाव आणखीन वाढला आहे. मात्र तरिही आपण माघार घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अखेरपर्यंत आपण उमेदवारी मिळवण्यासाठी रिंगणातच राहणार असल्याचे सांगून त्यांनी आपला लढाऊ बाणा दाखवून दिला आहे. आता ५ मार्चला आणखीन काही प्रांतांच्या प्रायमरीची निवडणूक होणार आहे. ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळाल्यास अध्यक्षीय निवडणुकीची मुख्य लढत पुन्हा एकदा ज्यो बायडेन आणि ट्रम्प यांच्यात होण्याची शक्यता आहे.