झेलेन्स्की यांच्यावर ट्रम्प चांगलेच निराश; युद्धबंदीबाबतच्या भूमिकेवरून केली टीका

वॉशिंग्टन : युक्रेनचे अध्यक्ष वोलोडायमिर झेलेन्स्की यांच्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचांगलेच निराश झाले आहेत, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्झ यांनी म्हटले आहे. रशिया-युक्रेन संघर्षाच्या अनुषंगाने झेलेन्स्की यांनी केलेल्या टिप्पणीनंतर वॉल्ट्झ यांनी ट्रम्प यांच्या प्रतिक्रियेवर विशेष भर दिला आहे. ट्रम्प हे रशिया-युक्रेनमधील युद्ध समाप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र शांततेसाठीच्या वाटाघाटींमध्ये भाग घेण्याची संधी झेलेन्स्की स्वीकारत नसल्याची टीका ट्रम्प यांनी केल्याचे वॉल्ट्झ यांनी सांगितले.
रशिया आणि युक्रेन यांच्यात दोन्ही बाजूंकडून हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू आहेत. पहिल्या महायुद्धप्रमाणे स्थिती निर्माण झाली आहे. ट्रम्प यांना झेलेन्स्की यांच्याबद्दल वाटणारी निराशा बहुआयामी आहे. युक्रेनच्या बाजूने अध्यक्ष ट्रम्प यांच्याबद्दल व्यक्त करण्यात येणारी काही मते आणि करण्यात येणारे अपमान अमान्य आहेत. झेलेन्स्की वाटाघाटींमध्ये सहभागी झाले नाहीत. त्यांना वाटाघाटींमध्ये सामील होण्याची संधी दिली गेली, तरी ते त्यासाठी तयार नाहीत. यामुळे ट्रम्प झेलेन्स्की यांच्यावर खूप निराश झाले आहेत, असे वॉल्ट्झ म्हणाले.
युद्धामध्ये युक्रेनला दिल्या जात असलेल्या मदतीमुळे अमेरिकेवर पडणारा आर्थिक बोजा वाढत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. केवळ युक्रेनमधील युद्धच नव्हे, तर युरोपातील संरक्षणासाठी अमेरिकेकडून करदात्यांचा पैसा यापेक्षा अधिक खर्च केला जाऊ शकणार नाही, हे आम्ही यापुर्वीच स्पष्ट केले आहे. आम्ही नाटोच्या सहकारी देशांना पुर्ण पाठिंबा देत आहोत. आमच्या कटिबद्धतेवरही आम्ही ठाम आहोत. मात्र आता नाटोतील सहकारी देशांनी पुढे यायला हवे, असेही वॉल्ट्झ म्हणाले.
वॉल्ट्झ यांनी झेलेन्स्की यांना अमेरिकेसोबतच्या खनिज करारावर आपली भूमिका सौम्य करण्याचे आणि वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनच्या नैसर्गिक संसाधनांमध्ये ५० टक्के वाटा मिळवण्याचा दावा करणारा प्रस्तावित करार सुरुवातीला अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी म्युनिक सुरक्षा परिषदेत सादर केला होता.
युक्रेनच्या युद्धावर अमेरिकेने ३५० दशलक्ष डॉलर खर्च केले आहेत. युरोपने दिलेल्या निधीपैकी ही रक्कम जास्त आहे. यापैकी काहीही परत मिळणार नाही. बायडेन यांनी हे युद्ध युरोपसाठीही महत्वाचे असल्याचे का म्हटले नव्हते. अमेरिकेकडून आतापर्यंत दिला गेलेला निधी हरवला असल्याचे झेलेन्स्की यांनीच मान्य केले आहे. झेलेन्स्की यांना त्यांच्या देशातच दोन टक्के मतांचा पाठिंबा आहे, अशी टीका ट्रम्प यांनी एका पोस्टमध्ये केली होती.
झेलेन्स्की यांची ट्रम्प यांच्यावर टीका
ट्रम्प यांनी रशियाशी युद्धबंदीच्या अनुषंगाने चर्चेला प्राधान्य दिल्याबद्दल झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. ट्रम्प यांच्यावर चुकीच्या प्रसाराचा पगडा असल्याचे झेलेन्स्की म्हणाले होते. आपल्याला चर्चेमध्ये बोलावण्यात आले नव्हते. युक्रेनच्या प्रतिनिधींशिवाय झालेल्या कोणत्याही चर्चेचा कोणताही निष्कर्ष युक्रेनला मान्य असणार नाही, असेही झेलेन्स्की म्हणाले होते. युक्रेनला नाटोचे सदस्यत्व मिळण्याची शक्यता नसल्याचे मत अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्को रुबिओ यांनी मांडले होते. त्यावरही झेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली होती.





