Mohan Bhagwat on Trump Tariff : भारताच्या उदयाला घाबरले ट्रम्प, म्हणून लादले शुल्क : मोहन भागवत

Mohan Bhagwat on Trump Tariff : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील ५० टक्के आयात शुल्काच्या निर्णयावर सणसणीत टिप्पणी केली आहे. नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी या शुल्कामागील कारण भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाची भीती असल्याचे सूचकपणे सांगितले.
भागवत म्हणाले, “जगातील काही देशांना भारताच्या प्रगतीची आणि सामर्थ्याची भीती वाटते. ‘जर भारत मोठा झाला, तर आमचे काय होईल?’ ही असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात आहे. या भीतीतूनच भारतावर हे शुल्क लादण्यात आले आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, जेव्हा आपण सर्वांना आपले मानतो, तेव्हा कोणीही शत्रू राहत नाही. मात्र, स्वार्थी आणि संकुचित विचारांमुळे असे निर्णय घेतले जातात, असं भागवत म्हणाले.
संत तुकारामांचा दाखला देत साधला निशाणा
भागवत यांनी संत तुकारामांचा दृष्टांत देत आपले म्हणणे स्पष्ट केले. ते म्हणाले, “संत तुकारामांचे हित संपूर्ण विश्वाच्या कल्याणात होते. पण जेव्हा आपण आपले ‘स्व’ मनात कोंडून ठेवतो, तेव्हा व्यक्तींपासून ते राष्ट्रांपर्यंत भांडणे उद्भवतात. ‘मला हवे आहे’ ही भावना इतरांचे हित विसरायला लावते. हीच जगातील संघर्षांची खरी कारणे आहेत.”
ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद पुन्हा स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापारात खळबळ माजवणारे पाऊल उचलले आहे. रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावरून भारतावर ५० टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याशिवाय, इतर अनेक देशांवरही मोठ्या प्रमाणात शुल्क लादले गेले आहे. या निर्णयामुळे भारतासह अनेक देशांमधील व्यापारी संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारताच्या प्रगतीला खीळ?
मोहन भागवत यांच्या मते, भारताच्या प्रगतीमुळे इतर देशांमध्ये निर्माण झालेली असुरक्षितता हेच या शुल्कामागील प्रमुख कारण आहे. भारताने गेल्या काही वर्षांत आर्थिक आणि राजनैतिक क्षेत्रात केलेली प्रगती जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. भागवत यांचे हे विधान ट्रम्प यांच्या धोरणावर केवळ टीकाच नाही, तर भारताच्या वाढत्या प्रभावाचा दाखलाही आहे.





