मोठी बातमी ! ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखले ; आता ७८८ भारतीय विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात ?

Trump vs Harvard University । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील सुरू असलेला तणाव थांबण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत. त्यातच आता ट्रम्प सरकारने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. हार्वर्ड विद्यापीठामध्ये परदेशी विद्यार्थ्यांना सध्या प्रवेश देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ट्रम्प प्रशासनाने विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबवले आहेत. यामुळे भारत आणि जगातील इतर देशांतील विद्यार्थ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.
अमेरिकेच्या एका इंग्रजी वर्तमानपत्राने होमलँड सिक्युरिटी विभागाच्या (DHS) सचिव क्रिस्टी नोएम यांनी हार्वर्ड विद्यापीठाला पाठवलेल्या पत्राचा हवाला देत हे वृत्त दिले आहे. यात “मी तुम्हाला कळवण्यासाठी लिहित आहे की हार्वर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थी आणि शैक्षणिक विनिमय प्रवेश कार्यक्रमाची मान्यता तात्काळ रद्द करण्यात आली आहे,” नोएमने पत्रात लिहिले आहे.
७८८ भारतीय विद्यार्थ्यांचे काय होईल? Trump vs Harvard University ।
हार्वर्डच्या अधिकृत नोंदीनुसार, दरवर्षी ५०० ते ८०० भारतीय विद्यार्थी विद्यापीठात प्रवेश घेतात. जगभरातून सुमारे ६८०० विद्यार्थी याठिकाणी शिक्षणासाठी येत असतात. या वर्षी ७८८ भारतीय विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. आता अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परदेशी विद्यार्थ्यांना दुसऱ्या संस्थेत प्रवेश घेण्यास किंवा अमेरिकेतील त्यांचा कायदेशीर दर्जा गमावण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे, भारतीय विद्यार्थ्यांना दुसऱ्या संस्थेत प्रवेश घेण्याचा पर्याय असेल. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांना अमेरिका सोडावी लागू शकते.
हार्वर्डमध्ये शिकणाऱ्या सध्याच्या विद्यार्थ्यांचे काय होईल?
हार्वर्डमध्ये चालू सत्र पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ते त्यांचे पदवीधर शिक्षण पूर्ण करू शकतील. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (DHS) च्या सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांनी त्यांच्या पत्रात हे नमूद केले आहे. त्यांनी लिहिले आहे की “ट्रम्प सरकारने केलेला बदल २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून लागू केला जाणार आहे.”
ट्रम्प आणि हार्वर्डमधील तणाव का वाढला? Trump vs Harvard University ।
ट्रम्प आणि हार्वर्ड यांच्यात तणाव आहे. ट्रम्प प्रशासनाला स्वतःच्या इच्छेनुसार विद्यापीठ चालवायचे आहे, परंतु हार्वर्ड यासाठी पूर्णपणे तयार नाही. यहुद्यांविरुद्ध द्वेष रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप हार्वर्डवर करण्यात आला. प्रशासनाने आरोप केला होता की ज्यू विद्यार्थी आणि प्राध्यापकांविरुद्ध भेदभाव केला जात आहे. आता ट्रम्प सरकारने परदेशी विद्यार्थ्यांबाबत घेतलेल्या निर्णयाकडे विद्यापीठांवरील वाढत्या दबावाच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.





