कधीही नाव न ऐकलेल्या देशावर ट्रम्प यांनी लावला सर्वाधिक टॅरिफ, अमेरिकेला कशाची निर्यात करतो ? जाणून घ्या

Donald Trump Reciprocal Tariffs | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ग्रेट अमेरिका’चा नारा देत जगभरातील 100 देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली आहे. यात भारतावर २६%, चीनवर ३४%, बांगलादेशवर ३७% तर कंबोडियावर ४९% टॅरिफ लावण्यात आला आहे. मात्र, जगातील एका छोट्याशा देशावर ट्रम्प यांनी सर्वाधिक कठोर कारवाई केली आहे.
लेसोथो नावाच्या लहान आफ्रिकन देशावर तब्बल ५०% टॅरिफ लावला आहे. हा देश अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे या देशाचे नाव फार कमी लोकांनी ऐकले असेल.
लेसोथो अमेरिकेला काय विकतो?
लेसोथो हा दक्षिण आफ्रिकेतील एक छोटा देश आहे. त्याची अर्थव्यवस्था केवळ 2.1 बिलियन डॉलर एवढी आहे. हा देश हिरे आणि कापड निर्यातीवर अवलंबून आहे. अमेरिकेला केलेल्या निर्यातीमुळे लेसोथोच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळतो.
अमेरिकेने लेसोथोवर सर्वाधिक टॅरिफ का लावला?
ट्रम्प प्रशासनाने टॅरिफ लावण्यासाठी एक विशेष सूत्र वापरले आहे. ज्यामध्ये अमेरिकेसोबतच्या देशाच्या व्यापार अधिशेषाला एकूण निर्यातीने भागले आणि नंतर त्याला दोनमधून वजा केले. या गणनेनंतर लेसोथोला ५०% टॅरिफ चा सामना करावा लागला.
ज्या देशांचा अमेरिकेसोबत मोठा व्यापार अधिशेष आहे, त्यांना सर्वाधिक टॅरिफ चा फटका बसला आहे. यात लेसोथो (५०%), कंबोडिया (४९%), लाओस (४८%), मादागास्कर (४७%), व्हिएतनाम (४६%), श्रीलंका आणि म्यानमार (प्रत्येकी ४४%), बांगलादेश, सर्बिया, बोत्सवाना (प्रत्येकी ३७%) यांचा समावेश आहे.
लेसोथोने २०२२ मध्ये अमेरिकेला 264 मिलियन डॉलर्सपेक्षा अधिक निर्यात केली होती, तर त्यांची अमेरिकेकडून आयात केवळ ८ मिलियन डॉलर्स होती. या मोठ्या फरकामुळे ट्रम्प प्रशासनाने लेसोथोला व्यापार नियमांचे उल्लंघन करणारे मानले आणि त्यावर सर्वाधिक टॅरिफ लावला. लेसोथोची जवळपास ७०% अर्थव्यवस्था अमेरिकेला केलेल्या निर्यातीवर अवलंबून आहे, जी आता आफ्रिकन ग्रोथ अँड अपॉर्च्युनिटी ॲक्ट (AGOA) अंतर्गत शुल्क-मुक्त व्यापाराचा लाभ घेऊ शकणार नाही. या निर्णयामुळे लेसोथोच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल आणि तेथील नोकऱ्यांवरही परिणाम होईल.
दरम्यान, यापूर्वीही ट्रम्प यांनी लेसोथोला लक्ष्य केले आहे. या देशाबद्दल कोणाला काहीच माहिती नसताना अमेरिका LGBTQI हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी ८ मिलियन डॉलरची मदत का द्यावी? असा प्रश्न उपस्थित केला होता.





