War Updates: युद्ध थांबणार! अमेरिका लवकरच माघार घेणार, ट्रम्प यांचे संकेत
War Updates: ट्रम्प यांनी यापूर्वीच संकेत दिले होते की, कोणताही करार न झाल्यासही अमेरिका पुढील २ ते ३ आठवड्यांत इराणमधून माघार घेऊ शकते. दरम्यान, या युद्धात हजारो लोकांचा बळी गेला असून जागतिक ऊर्जा पुरवठ्यावरही गंभीर परिणाम झाला आहे.

War Updates: अमेरिका-इराण युद्ध पाचव्या आठवड्यात दाखल झाले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. अमेरिका “खूप लवकर इराणमधून बाहेर पडेल”, मात्र गरज भासल्यास पुन्हा मर्यादित स्वरूपातील हल्ले (स्पॉट हिट्स) करण्याची तयारी ठेवेल, असे त्यांनी सांगितले.
रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, “युद्ध कधी संपेल हे नेमकं सांगू शकत नाही, पण आम्ही लवकरच बाहेर पडणार आहोत.” वाढत्या तेलदरांमुळे आणि बाहेर पडण्याच्या रणनीतीवर वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर ते भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा राष्ट्राला संबोधित करणार आहेत.
नाटोमधून बाहेर पडण्याचा इशारा –
ट्रम्प यांनी या भाषणात अमेरिका नाटो (NATO) मधून बाहेर पडण्याचाही विचार करत असल्याचे संकेत दिले. “इराणविरोधातील कारवाईत आमच्या मित्रदेशांनी साथ दिली नाही. हा एकतर्फी व्यवहार आहे,” असे म्हणत त्यांनी नाटो देशांवर नाराजी व्यक्त केली.
इराणचे अणुकार्यक्रम ठप्प झाल्याचा दावा –
अमेरिकेच्या कारवाईमुळे इराणला अण्वस्त्र विकसित करण्याची क्षमता उरलेली नाही, असा दावा ट्रम्प यांनी केला. “ते आता अण्वस्त्र बनवू शकत नाहीत. आम्ही बाहेर पडू, पण गरज पडल्यास पुन्हा येऊन हल्ले करू,” असे त्यांनी स्पष्ट केले. इराणने मात्र अण्वस्त्र विकसित करण्याचे आरोप सातत्याने फेटाळले असून त्यांचा कार्यक्रम पूर्णपणे शांततापूर्ण असल्याचे सांगितले आहे.
‘राजवट बदलली’ – ट्रम्प
हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी (Ali Khamenei) ठार झाल्यानंतर देशात पूर्ण राजवट बदल झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. इराणच्या नव्या नेतृत्वासोबत करार होण्याची शक्यता आहे. त्यांना आता आणखी हल्ले नकोत, असेही ते म्हणाले.
युरेनियम साठा ‘धोकादायक नाही’ –
इराणचा समृद्ध युरेनियम साठा खूप खोल जमिनीखाली असल्यामुळे सध्या मोठा धोका नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. मात्र उपग्रहांच्या मदतीने त्यावर लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, तेहरानने थेट चर्चेचा दावा फेटाळत केवळ मध्यस्थांमार्फत मर्यादित संवाद सुरू असल्याचे सांगितले आहे.
युद्धविरामासाठी अट – होर्मूज सामुद्रधुनी खुली हवी
ट्रम्प यांनी दावा केला की इराणच्या नव्या नेतृत्वाने युद्धविरामासाठी संपर्क साधला आहे. मात्र होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) खुली, सुरक्षित आणि वाहतुकीसाठी मोकळी झाली तरच आम्ही युद्धविरामाचा विचार करू,” अशी अट त्यांनी घातली.
जगातील सुमारे २० टक्के तेलपुरवठा या सामुद्रधुनीतून होतो. अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांनंतर इराणने येथे निर्बंध लावले आहेत. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने ही सामुद्रधुनी त्यांच्या नियंत्रणात असल्याचे सांगत ती शत्रूंना खुली केली जाणार नाही, असा इशाराही दिला.
युद्धविराम प्रस्ताव नाकारला –
अमेरिकेने मांडलेल्या १५ मुद्द्यांच्या युद्धविराम प्रस्तावात अण्वस्त्र कार्यक्रम थांबवणे, युरेनियम संवर्धन बंद करणे आणि होर्मूज सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे यांचा समावेश आहे. मात्र इराणने हा प्रस्ताव नाकारला आहे.
ट्रम्प यांनी यापूर्वीच संकेत दिले होते की, कोणताही करार न झाल्यासही अमेरिका पुढील २ ते ३ आठवड्यांत इराणमधून माघार घेऊ शकते. दरम्यान, या युद्धात हजारो लोकांचा बळी गेला असून जागतिक ऊर्जा पुरवठ्यावरही गंभीर परिणाम झाला आहे.





