ग्रीनलॅन्ड ताब्यात घेण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य, थेट धमकी देत म्हणाले…

नूक, (ग्रीनलॅन्ड) – निर्माण झालेल्या तणावात भर घालणारे वक्तव्य अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ग्रीनलॅन्ड अमेरिकेला जोडून घेण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याचा पर्याय सोडून दिलेला नाही, अशी गर्भित धमकीच त्यांनी दिली आहे.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांनी ग्रीनलॅन्डला भेट दिल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रीनलॅन्ड आणि डेन्मार्क दोन्ही देशांनी ट्रम्प प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. ग्रीनलॅन्डच्या सुरक्षेसाठी डेन्मार्कने काही केले नसल्याचे वान्स म्हणाले होते. त्यावर आर्क्टिक्ट प्रदेशाच्या सुरक्षेसाठी डेन्मार्कने पुरेशी गुंतवणूक केली असल्याचे डेन्मार्कच्या परराष्ट्र मंत्री लार्स लोक्के रासमुस्सेन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओ संदेशातून अमेरिकेला सुनावले होते. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी शनिवारी रात्री वृत्तवाहिनीशी बोलताना ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या बाबतीत मी कधीही लष्करी बळाचा पर्याय टाळत नसल्याचे सांगून खळबळ उडवून दिली आहे.
ग्रीनलॅन्ड लष्करीबळाशिवाय अमेरिकेमध्ये सामील व्हावा, याची चांगली शक्यता आहे. ही जागतिक शांतता आहे. ही आंतरराष्ट्रीय सुरक्षितता आहे. मात्र मी कोणताही पर्याय टाळत नाही, असे ट्रम्प म्हणाले.
जेडी वान्स हे आपल्या पत्नीसह ग्रीनलॅन्डमध्ये गेले होते. त्यांच्या समवेत अमेरिकेच्या वरिष्ठ मंत्री आणि पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ देखील असल्यामुळे ग्रीनलॅन्डने आक्षेप नोंदवला होता. ही भेट निमंत्रणाशिवाय असल्याने अधिकृत मानता येणार नाही, असे ग्रीनलॅन्ड आणि डेन्मार्कनेही म्हटले होते. तणाव वाढल्यामुळे वान्स यांना भेट एक दिवसात गुंडाळावी लागली होती.





