चार्ली कर्कच्या हत्येचा सुगावा लागला! 24 तासांच्या थरारानंतर संशयित पकडला, ट्रम्प यांची मोठी घोषणा

वाॅशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, युटा येथील विद्यापीठात झालेल्या गोळीबारात ठार झालेल्या कट्टरपंथी कार्यकर्ते चार्ली कर्क यांच्या हत्येप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी या घटनेला “क्रूर हत्या” असे संबोधले होते.
बुधवारी युटा व्हॅली विद्यापीठात (ओरेम) झालेल्या कार्यक्रमात ३१ वर्षीय कर्क यांच्यावर स्नायपरने गोळी झाडून हत्या केली होती. त्यानंतर २४ तासांनंतर पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. “मला वाटते आम्ही त्याला पकडले आहे,” असे ट्रम्प यांनी फॉक्स अँड फ्रेंड्स या कार्यक्रमात सांगितले.
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, संशयिताला ओळखणाऱ्या व्यक्तीने त्याची माहिती दिली आणि त्याच्या वडिलांनी स्वतःच त्याला पोलिसांच्या हवाली केले. मात्र संशयिताची ओळख अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही. राज्य पोलिसांकडे तो ताब्यात असून अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत माहिती देणार असल्याचे कळते.
याआधी तपासकर्त्यांनी या हत्येसाठी वापरलेली रायफल जवळच्या जंगलात सापडल्याची माहिती दिली होती. त्याचबरोबर काळा शर्ट, काळी कॅप आणि गॉगल घातलेल्या संशयिताचे धूसर सीसीटीव्ही फोटो व व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले होते. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) ने जाहीर केलेल्या फुटेजमध्ये आरोपी विद्यापीठाच्या छतावर चढून गोळी झाडताना व नंतर खाली उतरून पळताना दिसतो.
बुधवारी झालेल्या “प्रूव्ह मी रॉंग” या चर्चासत्रात, सुमारे ३,००० प्रेक्षकांसमोर कर्क बोलत असताना त्यांच्या मानेवर गोळी लागली. कर्क हे टर्निंग पॉईंट यूएसए या उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. “अमेरिकन कमबॅक टूर” अंतर्गत ते १५ महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम घेणार होते.
या हत्येने अमेरिकन राजकारणात संतापाची लाट उसळली असून डेमोक्रॅट्स, रिपब्लिकन तसेच परदेशी सरकारांनी राजकीय हिंसेचा निषेध केला आहे. कर्क विवाहित असून त्यांना दोन लहान मुले आहेत. रिपब्लिकन पक्षात त्यांना करिष्माई वक्ते आणि तरुणांमध्ये उजव्या विचारसरणीचा प्रचारक मानले जात असे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कर्क यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान – प्रेसीडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम – मरणोत्तर प्रदान करण्याची घोषणा केली आहे.





