Donald Trump : बोल्सेनारो यांना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशावर ट्रम्प यांच्याकडून निर्बंध

साओ पावलो (ब्राझील) : ब्राझीलचे माजी अध्यक्ष जेर बोल्सेनारो यांना देशाविरोधात बंड पुकारण्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून २७ वर्षांची शिक्षा सुनावणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अलेक्झांडरे डि मोराएस यांच्या पत्नीवर अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. ट्रम्प यांच्या निर्णयावर सोशल मीडियामधून टीका करणारे ब्राझीलमधील सॉलिसिटर जनरल जॉर्ज मेसियाह यांचा अमेरिकेचा व्हिसा देखील ट्रम्प प्रशासनाने रद्द केला आहे. ट्रम्प प्रशासनाचे हे निर्णय ब्राझीलमधील अंतर्गत व्यवहारामधील थेट हस्तक्षेप मानला जातो आहे.
न्यायाधीश अलेक्झांडरे डि मोराएस यांच्या पत्नी विवियने बार्सी डि मोराएस यांच्यावर ग्लोबल मॅग्नित्स्की कायद्याखाली निर्बंध घालण्यात आले आहेत. अमेरिकेतील मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात या कायद्यांतर्गत कारवाई केली जाते. बोल्सेनारो यांच्या प्रकरणाची सुनावणी केल्याबद्दल न्यायाधीश अलेक्झांडरे डि मोराएस यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.
न्यायाधीश मोराएस यांच्याबरोबरीने सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांचे अमेरिकेचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. मोराएस यांच्या कुटुंबाची मालकी असलेल्या कंपनीवरही मॅग्नित्स्की कायद्याखाली निर्बंध घातले गेले आहेत. अमेरिकेच्यावतीने ब्राझीलमधील अन्य अधिकाऱ्यांवरही निर्बंध घातले गेले आहेत. तसेच अन्य अनेक देशांप्रमाणे ५० टक्के आयात शुल्क लावण्यात आले आहे.





