टोरंटो – कॅनडातील संसदीय निवडणूकीत पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या पक्षाचा विजय झाला आहे. मात्र बहुमत मिळवण्यात या पक्षाला अपयश आले आहे. ट्रुडो यांचे सरकार पाडले जाण्याची शक्यता नव्हती. मात्र तरिही ट्रुडो यांनी बहुमत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.
करोनाच्या साथीला पुरेशा प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी संसदेत बहुमत आवश्यक असल्याचे ट्रुडो यांनी म्हटले होते. याच कारणासाठी कॅनडामध्ये सरकारची मुदत संपायला 2 वर्षे शिल्लक असतानाच मुदतपूर्व निवडणूका घेण्यात आल्या. कॅनडातील करोनाची साथ तीव्र असताना मध्यावधी निवडणूका लादल्याबद्दल विरोधकांकडून ट्रुडो यांच्यावर टीकाही केली जात होती.
ट्रुडो यांच्या द लिबरल पार्टीला 156 जागा मिळाल्या आहेत. 2019 मध्ये झालेल्या निवडणूकांपेक्षा यावेळी ही संख्या एका जागेने कमी आहे. संसदेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या 170 पेक्षा ट्रुडो यांच्या पक्षाला अजूनही 14 जागा कमी आहेत.
कंझर्व्हेटिव्ह पक्षाला 121 जागांवर विजय मिळाला आहे. गेल्या निवडणूकीतही त्यांना तेवढ्याच जागा मिळाल्या होत्या, तर न्यू डेमोक्रॅट पक्षाला नाममात्र 27 जागांवर विजय मिळाला आहे. त्या पक्षाच्या 3 जागा वाढल्या आहेत.