‘… तर अमेरिकेलाच याची मोठी किंमत चुकवावी लागेल’, ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयावर ट्रुडोंचा इशारा

Justin Trudeau: डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसरा कार्यकाळाची सुरुवात अनेक वादग्रस्त निर्णयापासून झाली आहे. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिको या देशांवर 25 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लागू करणार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी देखील अमेरिकेला इशारा दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाच्या उत्पादनांवर व्यापक टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतल्यास अमेरिकेलाच याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे ट्रुडो यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेवर बोलताना ट्रुडो म्हणाले की, ‘20 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारी , 15 फेब्रुवारी किंवा 1 एप्रिल असो… जेव्हा ते टॅरिफ लादतील त्यावेळी कॅनडाकडून देखील उत्तर दिले जाईल व अतिरिक्त शुल्क लादण्यात येईल. यामुळे अमेरिकन ग्राहकांसाठीही प्रत्येक गोष्टीची किंमत वाढेल. असे व्हावे असे ट्रम्प यांना नक्कीच वाटत नसेल.’
अमेरिकेने कॅनडासोबत आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या वस्तू आणि खनिजांवर काम करायला हवे. ट्रम्प यांनी तसे करण्याचे आश्वासन देखील दिले आहे. जर ट्रम्प यांनी टॅरिफ लादण्याचा प्रयत्न केल्यास, तेवढ्याच जोरदारपणे प्रत्युत्तर देण्यास आम्ही तयार आहोत., असेही ट्रुडो म्हणाले.
दरम्यान, ट्रम्प यांनी वारंवार टॅरिफमध्ये वाढ करणार असल्याचे म्हटले आहे. जोपर्यंत कॅनडा आणि मेक्सिको बेकायदेशीर स्थलांतरितांना आणि घातक फेंटॅनाइल ड्रगला अमेरिकेत येण्यापासून रोखत नाहीत, तोपर्यंत या दोन देशांमधून आयात केलेल्या वस्तूंवर 25% शुल्क लागू असेल, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.





