Trisha Krishnan: अभिनेत्री नव्हे तर क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट बनायचं होतं त्रिशा कृष्णनला; अभिनयासाठी सोडलं पुढचं शिक्षण
Trisha Krishnan १९९९ मध्ये तिने छोट्या भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये अनेक सुपरहिट भूमिका साकारल्या. तिची ऑनस्क्रीन जोडी विजय, महेश बाबू, सूर्या आणि धनुषसारख्या अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत प्रेक्षकांना खूप आवडली.

Trisha Krishnan: तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. अभिनेता आणि राजकारणी विजय थलापती याच्याशी असलेल्या मैत्रीमुळे तिचं नाव गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. मात्र, अनेकांना माहिती नसलेली गोष्ट म्हणजे त्रिशा फक्त सुंदर आणि यशस्वी अभिनेत्रीच नाही, तर ती उच्चशिक्षितदेखील आहे. विशेष म्हणजे तिला लहानपणापासून अभिनेत्री नव्हे, तर क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट बनायचं होतं.
त्रिशा कृष्णनचा जन्म ४ मे १९८३ रोजी चेन्नई येथे झाला. तिने तिचं शालेय शिक्षण चेन्नईतील सेक्रेड हार्ट मॅट्रिक्युलेशन स्कूलमध्ये पूर्ण केलं. शाळेपासूनच ती अभ्यासात चांगली होती. त्यानंतर तिने चेन्नईतील प्रसिद्ध इथिराज कॉलेज फॉर वुमनमध्ये प्रवेश घेतला. येथे तिने बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या विषयात पदवी प्राप्त केली.
कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्रिशाची मॉडेलिंगमध्ये रुची वाढू लागली. तिच्या सौंदर्यामुळे आणि आत्मविश्वासामुळे तिला विविध जाहिराती आणि मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळू लागल्या. सुरुवातीला तिने हे फक्त छंद म्हणून सुरू केलं होतं. पण पुढे तिच्या आयुष्याने वेगळंच वळण घेतलं.

Trisha Krishnan
त्रिशाला मूळात क्रिमिनल सायकॉलॉजी या क्षेत्रात करिअर करायचं होतं. गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्याची तिला आवड होती. यासाठी पुढे विशेष शिक्षण घेण्याची तिची इच्छा होती. मात्र, मॉडेलिंगदरम्यान तिला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि अभिनय क्षेत्रात तिचं नशीब उजळलं. त्यामुळे तिने पुढील शिक्षणाचा विचार बाजूला ठेवत अभिनय क्षेत्रात पूर्णवेळ करिअर करण्याचा निर्णय घेतला.
१९९९ मध्ये तिने छोट्या भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये अनेक सुपरहिट भूमिका साकारल्या. तिची ऑनस्क्रीन जोडी विजय, महेश बाबू, सूर्या आणि धनुषसारख्या अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत प्रेक्षकांना खूप आवडली. अभिनयासोबतच तिच्या साध्या स्वभावामुळेही तिने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केलं.
त्रिशा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिली आहे. २०१५ मध्ये तिचा उद्योजक वरुण मनियनसोबत साखरपुडा झाला होता. मात्र, काही महिन्यांतच हे नातं तुटलं. त्याबद्दल बोलताना त्रिशाने सांगितलं होतं की, तिला अभिनय सोडण्याची अट घालण्यात आली होती. त्यामुळेच तिने साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला.
आज त्रिशा दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. शिक्षण, करिअर आणि वैयक्तिक आयुष्य या तिन्ही गोष्टींमध्ये तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.





