Trinamool Congress : पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बंगालमधील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसचा (Trinamool Congress) पाठिंबा घटत चालल्याचा दावा त्या पक्षाने केला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या दालनात मंगळवारी भाजप आमदारांची बैठक झाली. त्यावेळी पक्षाचे निवडणूक सहप्रभारी बिप्लब देब हेही उपस्थित होते. त्या बैठकीत तृणमूलचा जनाधार घटत चालल्याची भावना व्यक्त करण्यात आली. निवडणूक प्रचारात कुठली रणनीती अवलंबायची यावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचे समजते. आमदारांना अधिकाधिक काळ जनतेत राहण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. बंगालमध्ये सुमारे १५ वर्षांपासून तृणमूलची सत्ता आहे. त्या मोठ्या कालावधीमुळे तृणमूलला प्रस्थापितविरोधी स्थितीला सामोरे जावे लागू शकते. त्यातून यावेळी बंगाल जिंकण्याची चांगली संधी आहे, असे भाजपचे आडाखे आहेत. बंगालसह ५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत वेळापत्रकानुसार मार्च-एप्रिलमध्ये विधानसभा निवडणुका होतील. राजकीय रणसंग्रामाला सामोऱ्या जाणाऱ्या राज्यांपैकी बंगालवर भाजपने विशेष फोकस केला असल्याचे दडून राहिलेले नाही. त्या राज्यात आगामी निवडणुकीत तृणमूल आणि भाजपमध्येच प्रमुख लढत अपेक्षित आहे.