Trimbakeshwar Shiva Temple – पवित्र अशा श्रावण महिन्यातच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये संतापजनक प्रकार घडला आहे. सलगच्या सुट्टयांमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये लाखो भाविक दाखल होत आहेत. अशा वेळी मंदिराच्या सुरक्षारक्षकांच्या घोळक्याने एका भाविकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी दहावे ज्योतिर्लिंग म्हणून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरची ओळख आहे. कुंभमेळ्याचे देखील हे स्थान असल्याने भाविकांचा मोठा ओढा येथे बघायला मिळतो. सलगच्या सुट्ट्यामुळे लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाल्याने गर्दी पांगवण्यासाठी मंदिर संस्थानने मुख दर्शन सुरू केले होते. मात्र अचानक मुख दर्शन बंद केल्याने रांगेत उभे असलेले भाविक संतप्त झाले होते. भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झाली. याच वादातून या सुरक्षारक्षकांनी थेट कायदाच हातात घेतला. दरम्यान या मारहाण प्रकरणी मंदिर संस्थानचे विश्वस्त कैलास घुले यांनी अजब स्पष्टीकरण दिले असून भाविकांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला असं त्यांनी सांगत सुरक्षारक्षकांनी कोणतीही मारहाण केली नसून फक्त झटापट झाली असाही असा दावा केला आहे.