इस्लामाबाद – चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज काबूल येथे त्रिस्तरिय बैठक होते आहे. तिन्ही देशांचे एकमेकांशी असलेले सहकार्याचे संबंध अधिक दृढ करण्याच्या मुद्द्यावर या बैठकीमध्ये चर्चा अपेक्षित आहे. तसेच प्रदेशातील सुरक्षा विषयक स्थिती आणि दहशतवादाच्या समस्येबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांचे या त्रिस्तरिय बैठकीसाठी काबूलमध्ये आज आगमन झाले. दार यांच्यासोबत अफगाणिस्तानचे विशेष प्रतिनिधी, राजदूत मोहम्मद सादिक आणि परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आहेत. ते अफगाणिस्तानचे प्रभारी परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय मुद्द्यांवर देखील चर्चा करणार आहेत. या त्रिस्तरिय चर्चेची शेवटची फेरी मे महिन्यात बीजिंगमध्ये झाली होती. तेंव्हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने राजदूत पातळीवर त्यांचे राजनैतिक संबंध सुधारण्यास सहमती दर्शविली होती. त्रिपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करण्यास तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सहमती दर्शविली होती. २०२१ मध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांचा अफगाणिस्तानला हा पहिलाच दौरा आहे. तर एप्रिलनंतर दार यांचा अफगाणिस्तानमध्ये तिसरा दौरा आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव कमी करण्यात चीनने भूमिका बजावली असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.