New Zealand Cricket : बोल्टने ‘या’ कारणांमुळे संपवला न्यूझीलंड मंडळाचा करार

ऑकलंड – न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने न्यूझीलंड क्रिकेट मंडळाशी असलेला केंद्रीय करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंड मंडळानेही त्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. बोल्ट इतक्यात निवृत्त होणार नसल्याने चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि जगभरातील क्रिकेट लीग खेळण्यासाठी त्याने हे सर्व केले आहे. बोल्टच्या या निर्णयानंतर न्यूझीलंड मंडळाने चाहत्यांना कोणत्याही चुकीच्या गोष्टींवर टीका सुरू करू नका. त्याने केवळ करार संपवला आहे. निवृत्ती घेतलेली नाही, असेही मंडळाने सांगितले.
बोल्टने न्यूझीलंडकडून 78 कसोटीत 317 बळी, तर 93 एकदिवसीय सामन्यांत 169 बळी घेतले आहेत. त्याने 44 टी-20 सामन्यात 62 गडी बाद केले आहेत. बोल्ट आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.

