Tree Collapse: झाडपडीसह आगीच्या घटनांनी धावपळ! १० ठिकाणी झाडे उन्मळून पडली, ३ ठिकाणी आग
Tree Collapse: शहरात सुरू असलेल्या पावसामुळे विविध भागांत आपत्कालीन परिस्थिती; अग्निशमन दलाच्या जवानांची दिवसभर धावपळ.

Tree Collapse – शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाने विविध आपत्कालीन घटनांमध्ये तत्परतेने मदतकार्य केले. झाडपडी, आग आणि पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी दिवसभर अग्निशमन जवानांची धावपळ सुरू होती. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, शहरात विविध भागांत झाडे पडण्याच्या १० घटना घडल्या. या ठिकाणी तातडीने पोहोचून झाडे व फांद्या हटविण्यात आल्या.
त्यामुळे वाहतुकीतील अडथळे दूर करण्यात यश आले. याशिवाय यमुनानगर, पांजरपोळ परिसरासह शहरातील तीन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी वित्तहानी आणि संभाव्य जीवितहानी टळली. दरम्यान, मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिक अडकून पडले होते. अशा १२ ठिकाणी अग्निशमन दलाने बचावकार्य राबवून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले.
काही ठिकाणी दोरीच्या साहाय्याने तर काही ठिकाणी विशेष बचाव साहित्याचा वापर करून नागरिकांची सुटका करण्यात आली. संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि इतर यंत्रणा समन्वयाने कार्यरत असून नागरिकांनी आवश्यक तेवढ्याच कामासाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.





