सिंहगड परिसरात पर्यटक आल्या पावली माघारी

पुणे – सिंहगड परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पोलिसांकडून दर शनिवारी आणि रविवारी दुपारी दोन वाजल्यानंतर गडावर वाहने नेण्यासाठी बंदी घालण्याचा तसेच खडकवासला परिसरात वाहनांची पार्किंग करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रविवारी पहिल्यांदाच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून त्यामुळे अनेक पर्यटकांना पायथ्यापासूनच परतावे लागले. तर अनेकांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले.
पावसाळ्यात दर शनिवार आणि रविवारी सिंहगड आणि खडकवासला धरण परिसरात पर्यटकांची प्रचंड वर्दळ असते. त्यातच बेशिस्त पार्किंग करण्यात आल्याने धरण परिसरात अनेकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने तासन्तास नागरिक याठिकाणी अडकतात. गेल्या काही दिवसांमध्ये वाहतूक कोंडीमुळे 20 हजाराहून अधिक पर्यटक याठिकाणी अडकल्याची नोंद ग्रामीण पोलिसांकडून नोंदविण्यात आली होती. याची दखल घेत, पोलिसांनी दुपारनंतर वाहनबंदीचा निर्णय जाहीर केला होता. तसेच, खडकवासला चौपाटीवर खाद्यपदार्थ विक्रीस तसेच वाहनांच्या पार्किंगला बंदी घातली होती. हवेली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या नेतृत्वाखाली रविवारी या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली.





