भारतावरील प्रवासी निर्बंध ब्रिटनकडून शिथील

लंडन – ब्रिटनने भारतावरील प्रवासी निर्बंध अंशतः शिथील केले आहेत. आता भारतात करोना विरोधी लस घेतलेल्या भारतीयांना ब्रिटनमधील हॉटेलात 10 दिवसांच्या विलगीकरणामध्ये राहण्याची आवश्कता असणार नाही. भारताला आता “रेड’ यादीमधून “अंबर’ यादीमध्ये हलवण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठीच्या ब्रिटनच्या यंत्रणेने भारताला “अंबर’ यादीमध्ये समाविष्ट केल्यामुळे आता भारतातील प्रवाशांना हॉटेलात विलगीकरणात रहायची आवश्यकता नसेल. पण या प्रवाशांना घरीच विलगीकरणात रहावे लागणार आहे. हवाई वाहतुक विभागाने जाहीर केलेले हे नियम स्थानिक वेळेप्रमाणे 8 ऑगस्टला, रविवारी पहाटे 4 वाजल्यापासून लागू होणार आहेत.
या बदललेल्या नियमांनुसार युएई, कतार, भारत आणि बहारीनला “रेड’ यादीतून “अंबर’ यादीमध्ये टाकण्यात आले आहे, असे ब्रिटनचे वाहतुक मंत्री ग्रांट शाप्स यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या देशांमध्ये झालेल्या लसीकरणामुळेच या देशांच्या प्रवाशांना आता कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. ब्रिटनमधील प्रवासी निर्बंध शिथील करण्यात यावेत, अशी मागणी ब्रिटनमधील भारतीय समुदायाकडून करण्यात येत होती.





