Prataprao Jadhav : जीबीएसमुळे राज्यातील यात्रांवर निर्बंध आणणार; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांची माहिती

बुलढाणा : राज्यात अनेक ठिकाणी जीबीएसचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी वाढताना दिसत आहे. तसेच याचा वाढता प्रादुर्भाव व धोका पाहता राज्यातील यात्रांवर निर्बंध आणले जाऊ शकतात. लवकरच अधिकारी आणि प्रशासनाची बैठक घेऊन यावर निर्णय घेणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर हा आजार संसर्गजन्य असल्याचे समोर आले तर त्यावर कडक उपाययोजना केल्या जातील, असेही जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
जाधव म्हणाले, जीबीएस हा आजार जर गर्दीमुळे होत असल्याचं किंवा संसर्गजन्य असल्याची माहिती मिळाली तर वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच राज्यातील यात्रांवर निर्बंध आणण्यात येईल. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या सैलानी यात्रेवरही निर्बंध आणण्याबाबत विचार सुरू आहे.
दरम्यान, राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमच्या एकूण रुग्णसंख्येपैकी सर्वात जास्त रूग्णसंख्या 42 रुग्ण हे 20 ते 29 वर्षे वयोगटांतील आहेत. त्याखालोखाल 50 ते 59 वर्षे वयोगटांतील मुलांचे प्रमाण 28 टक्के इतके आहे. या आकडेवारीनुसार, तरुणांमध्ये या आजाराचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर 40 ते 49 वर्षे वयोगटांतील 27, 10 ते 29 वर्षे वयोगटांतील 23, 30 ते 39 वर्षे वयोगटांतील 23, 60 ते 69 वर्षे वयोगटांतील 21, 70 ते 80 वर्षे वयोगटांतील सहा आणि 80-89 वर्षे वयोगटांतील चार रुग्णांचा समावेश आहे.





