गुजरातमध्ये 425 कोटींचे हेराॅईन ड्रग्ज जप्त

अहमदाबाद – गुजरातमध्ये एटीएसने भारतीय तटरक्षक दलाच्या संयुक्त कारवाईत मोठी कारवाई केली आहे. एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाने गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील ओखा जवळ तब्बल 61 किलो ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 425 कोटी रुपये एवढी किंमत आहे. या कारवाईत 5 इराणी क्रू मेंबर्ससह बोट ताब्यात घेण्यात आली आहे.
सध्या पुढील तपासासाठी बोट ओखा येथे आणण्यात आली असल्याची माहिती पीआरओ डिफेन्स गुजरातने दिली. गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सामायिक केलेल्या गुप्त माहितीच्या आधारे, भारतीय तटरक्षक दलाने आपल्या दोन गस्ती जहाजांना गस्तीसाठी अरबी समुद्रात तैनात केले. याबाबत एका अधिकाऱ्याने माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी, ओखा किनारपट्टीपासून सुमारे 340 किमी अंतरावर भारतीय पाण्यात एक बोट संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. त्यानंतर भारतीय गस्ती जहाजांनी आव्हान दिल्यावर बोटीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या बोटीचा पाठलाग करत पोलिसांनी ती बोट पकडली. या इराणी बोटीतून सुमारे 425 कोटी रुपयांचे सुमारे 61 किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, एकीकडे एटीएसने कारवाई केली तर, दुसरीकडे ईडी छापेमारी करत आहेत. त्यानुसार, महाराष्ट्रात मागील काळात अनेकदा छापेमारी करण्यात आली असून, पुन्हा एकदा महाराष्ट्रात ईडी सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नागपूरसह 15 वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने छापेमारी केली असून, या छापेमारीत ईडीच्या अधिकाऱ्यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातून मोठी मालमत्ता जप्त केली आहे.





