पोलीस दलातील बदल्यांमध्ये पारदर्शकता महत्वाची : दिलीप वळसे पाटील

पुणे : पोलीस दलातील बदल्यांमध्ये जेवढी पारदर्शकता असेल तेवढी महत्वाची आहे. ओळखीच्या किंवा वशिलेबाजी करणाऱ्या लोकांना चांगल्या ठिकाणी बदली मिळण्यापेक्षा रीतसर अर्ज मागवून पोलिसांना संधी दिल्यास निश्चितच एक चांगला संदेश पोहोचेल. त्यामुळे पुणे पोलिसांनी जनरल ट्रान्सफर पोलीस मॅनेजमेंट सिस्टीम ( जीटीपीएमएस) ही विकसित केलेली प्रणाली अत्यन्त फायदेशीर असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
गृहमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदाच पुण्याच्या पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. त्यांना पोलीस सलामी देण्यात आली. आयुक्तालयातील भरोसा विभागातील बाल सहाय्यता कक्ष, महिला सहाय्यता आणि ज्येष्ठ नागरिक कक्ष तसेच गुन्हे शाखेला त्यांनी भेट देऊन कामाची माहिती करून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
आजवर पुणे पोलिसांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. नुकतीच पोलिसांच्या अंतर्गत बदल्यांसाठी जीटीपीएमएस ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे, त्याचे वळसे पाटील यांनी कौतुक केले.
ही प्रणाली पुण्यासह इतर ठिकाणी देखील सुरू झाली आहे. पोलीस दलातील बदल्यांमध्ये पारदर्शकता महत्वाची आहे. या प्रणालीचा पोलीस दलाला फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.





