मुंबई – शिंदे सरकारकडून बदल्यांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. शुक्रवारी 40 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या शिंदे सरकारकडून करण्यात आल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा शनिवारी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अनिल डिग्गीकर यांची म्हाडातून सिडकोच्या उपाध्यक्षपदी बदली करण्यात आली आहे.
तर सिडकोतून संजय मुखर्जी यांना पदोन्नती देत एमएमआरडीएचे आयुक्त बनवले आहे. तसेच मनिषा म्हैसकर यांना अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी देण्यात आली असून डॉ. के. गोविंदराज हे नगरविकास खाते (2), प्रधान सचिव म्हणून कामकाज पाहतील. विशेष, म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी मुंबई महापालिकेतून नगरविकास खाते(2)मध्ये बदली झालेले आशिष शर्मा यांची 24 तासांतच पुन्हा बदली करण्यात आली. आता शर्मा यांना एमएमआरडीएमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून पाठवण्यात आले आहे.