पिंपरी | निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग

मावळ, (प्रतिनिधी) – मावळ विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण शिबिर नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तळेगाव दाभाडे येथे पार पडले.
शनिवार (दि.२६) आणि रविवार (दि.२७) असे दोन दिवस हे प्रशिक्षण शिबिर पार पडले. शनिवारी एकूण १३८० प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले. तर रविवारी १७२३ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले. दोन दिवसात एकूण ३१०३ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती निवडणूक कार्यालयाने दिली.
प्रशिक्षणार्थींना मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख यांनी मार्गदर्शन केले. संगणकीय प्रणाली द्वारे हे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच प्रत्येकी ५० प्रशिक्षणार्थींच्या बॅचमध्ये स्वतंत्र खोलीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना ईव्हीएम मशीन हाताळणीचे प्रशिक्षण दिले गेले.
निवडणूक अधिकारी सुरेंद्र नवले यांनी प्रशिक्षणार्थीना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले. सोबत निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सोपविलेली जबाबदारी व कर्तव्ये सांगून सर्वांनी निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडावी, अशा सूचना दिल्या आहेत.





